नाशिकमधून 2 कोटी 45 लाख नोटांचं हवाई उड्डाण
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 05:53 PM (IST)
नाशिक : नाशिकच्या सिक्युरीटी प्रेसमधून पुन्हा एकदा 24.5 मिलियन म्हणजे 2 कोटी 45 लाख नोटांनी हवाई उड्डाण केलं आहे. केरळ, चंदीगड आणि चेन्नईला या नोटा पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती मजदूर युनियन सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी 'माझा'शी बोलताना दिली. केरळला 55 लाख, चंदीगडला 35 लाख, चेन्नईला 1 कोटी 55 लाख नोटा रवाना झाल्या आहेत. या नोटांमुळे पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील नोटांचा तुटवडा कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. विमानाने नोटा पुरवण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सिक्युरीटी प्रेसचे मुख्य संचालक प्रवीण गर्ग यांनी दुप्पट क्षमतेने 500 च्या नव्या नोटा छापण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी एक हजार कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. सिक्युरीटी प्रेसमधून आतापर्यंत 30 कोटी नोटांचा पुरवठा करण्यात आला आहे.