मुंबई : नीरव मोदी भारतात येऊ इच्छितात मात्र त्यांना भारतात ठार मारतील, असा दावा त्याच्या वकीलांनी सुनावणीदरम्यान केला आहे. तसेच नीरव मोदी 1 जानेवारी 2018 ला परदेशात गेले. त्याचवेळी त्यांच्यावर जानेवारी अखेरीस गुन्हा दाखल झाला. याचा अर्थ ते पळून गेले असा होत नाही, असेही ते म्हणाले. मुंबईतील सत्र न्यायालयात आज सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या वकीलांनी त्याची बाजू मांडली.


नीरव मोदीचे वकील पुढे म्हणाले की, "नीरव मोदी भारतात येऊ इच्छितात मात्र भारतात त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांचे मॉब लीचिंग होऊ शकते, अशी भीती आहे. म्हणून ते भारतात येऊ शकत नाहीत," असे ते म्हणाले.

नीरव मोदी यांचे परदेशातही अनेक व्यवसाय आहेत. त्यासाठी ते नियमित असलेला पासपोर्ट, व्हिसा घेऊन गेले होते. शिवाय ईडीने त्यांचे कार्यालय, घर, शोरुम अशी सर्व मालमत्ता जप्त केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुख्य कर्मचारी वर्गालाही अटक केली आहे. ज्यामुळे नीरव मोदी कोणतेही कागदपत्रे देऊ शकत नाहीत, कारण या सर्व गोष्टी ईडीकडे आहेत, असे नीरव मोदी यांचे वकील न्यायालयात बाजू मांडताना म्हणाले.

नीरव मोदी याच्यावर पंजाब नॅशनल बँकेचे 13500 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने नीरव मोदीच्या विरोधात 24 मे तर त्याचा मामा मेहूल चोक्सीच्या विरोधात 26 मे रोजी दोषारोप दाखल केले होते. दोघांवरही अजामीनपात्र वांरट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच इंटरपोलने निरव आणि मेहूल चोक्सीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढले आहे.

पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीची आतापर्यंत भारत आणि विदेशातील 4400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीसह बँकेच्या अधिकाऱ्यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे.