गाझियाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळत आहे. ही गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केली आहे. काही सूचनाही या उपसमितीने सुचवलेल्या आहेत. जगभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापैकी सर्वाधिक उंच हा पुतळा असणार असल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे. 


कसा असणार आहे हा पुतळा?


उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील राम सुतारयांच्या वर्कशॉपमध्ये धगधगत्या धातूंची कास्टिंग सुरु आहे. जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो-लाखोंच्या संख्येने पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र या पुतळ्यापैकी सर्वाधिक उंचीचा पुतळा दादरच्या इंदू मिलमधील स्मारकात असणार आहे. साडे तीनशे फूट उंचीचा हा पुतळा आणि शंभर फुटांच्या चबुतऱ्यावर उभा केला जाणार आहे. एकूण साडेचारशे फूट उंचीचा हा पुतळा दिमाखात उभा असणार आहे. थोडक्यात 50 मजली इमारतीचे जेवढी उंच असेल तेवढ्या उंचीचा हा पुतळा समुद्राच्या किनारी पाहायला मिळेल. याच पुतळ्याची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती थेट उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये पोहोचली आहे.


इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेबांचा राष्ट्रीय स्मारकातील भव्यदिव्य पुतळ्याची काय आहेत वैशिष्ट्ये....



  • साडेतीनशे फुटांचा पुतळा आणि शंभर फुटांचा चबुतरा असा एकूण साडेचारशे फुटांचा हा भव्यदिव्यपुतळा असणार आहे

  • हा पुतळा ब्रांझ या धातूपासून बनवला जाणार आहे

  • या पुतळ्याच वजन तब्बल 850 टन असणार आहे

  • 50 मजली इमारतीएवढी उंची असणारं आहे

  • या पुतळ्याच्या आतमध्ये 600 टनांचं स्टील असणार आहे

  • या पुतळ्याची विंड टनेल टेक्नॉलॉजी आहे

  • ही टेक्नॉलॉजी कॅनडाची आहे

  • सव्वा दोनशे प्रति किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने याची टेस्ट करण्यात आली

  • कारण समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग असतो

  • खाऱ्या पाण्यापासून संरक्षण होणार अशी टेक्नॉलॉजी आहे

  • जमिनीवर 90 मीटर जागेत उभा असणार आहे

  • या पुतळ्याचा वरील भाग 22 मीटर परिघ असेल

  • 400 कोटींच्या आसपास याचा खर्च अपेक्षित आहे

  • 2024 पर्यंत हा पुतळा पूर्ण होणार आहे


इंदू मिलच्या सुमारे 12 एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणार असून संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणेच दिसणार आहे. त्यामुळे इंदू मिल परिसरात अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरात असणार्‍या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच पुतळा उभा राहणार आहे. 


Bhim Jayanti 2022 : इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले... 


याआधीच्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची ही 80 फूट इतकी होती. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ही उंची 80 फुटांवरुन 350 फूट इतकी वाढवण्यात आली आहे. तसंच या स्मारकाच्या आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या आर्ट गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कलाकृतीही ठेवल्या जाणार आहेत. या शिवाय चवदार तळ्याची प्रतिकृती, लायब्ररी आणि प्रेक्षागृहही स्मारकात असणार आहे.


या स्मारकाची इमारत आणि पुतळ्याची उभारणी वगळता प्रकल्पाचे 49.5 टक्के काम पूर्णझाले आहे. तर स्मारकाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 6.65 टक्के काम पूर्णत्वास गेलं आहे. मार्च 2024 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्याचं नियोजन राज्य सरकारचं आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक चर्चेत आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अनेक वर्षांपासून हे काम रखडलेल होत. त्यामुळे 600 कोटी रुपयांवरुन याचा खर्च आता एक हजार कोटीवर गेला आहे. त्यामुळे या कामाला पुन्हा एकदा गती देण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची उपसमिती गठित केली आहे. त्यामुळे या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळते. मात्र हे स्मारक पूर्ण होईपर्यंत अशीच कामाची गती राहाणार का? हे ही पाहावं लागणार आहे.