चेन्नई: अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालाची आतुरता सगळ्या जगालाच लागली आहे. परंतु त्याची सर्वात जास्त आतुरता ही भारतातील एका खेड्याला लागलीय असं सांगितलं तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल. जसजसे जो बायडेन विजयाच्या समीप पोहोचत आहेत तसतसे या गावात आनंद साजरा केला जात आहे. या गावात प्रत्येकाने आपल्या दारात रांगोळ्या काढल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी गेली दोन दिवस या गावातील मंदिरात पूजाअर्चा आणि अभिषेक केला जात आहे. त्यासाठी इतरही अनेक धार्मिक विधी करण्यात आले आहेत. निवडणूकीच्या निकालाच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट घेतले जात आहेत. हे गाव आहे तामिळनाडूतील थुलसेंद्रपूरम. अमेरिकेपासून तब्बल आठ हजार मैलावरच्या या गावाला अमेरिकेच्या निवडणुकीचे काय पडले आहे असा प्रश्न प्रत्येकाला पडण्याचा संभव आहे.


हे गाव अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे मूळ गाव. या गावातच कमला यांच्या आजोबांचा जन्म झाला आहे.


डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. ते जर विजयी झाले तर कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळेल. कमला यांच्या बाबतीत ही आनंदाची बातमी कधीही येऊ शकते त्यामुळे तामिळनाडूतील थिरुवर जिल्ह्यातील या गावातील प्रत्येक घराचे अंगण हे आज सकाळपासूनच रांगोळ्यांनी सजायला सुरु झालंय. प्रत्येकाच्या घरासमोर गुलाब आणि सुगंधी जास्मिनच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. सकाळपासूनच मंदिरात लगबग वाढत आहे. पुरुषांनी पाढरी स्वच्छ लुंगी तर स्त्रियांनी गडद रंराच्या साड्या परिधान केल्या आहेत. जागतिक महासत्तेच्या अध्यक्षपदी आपल्या गावची व्यक्ती विराजमान होणार याची खात्री प्रत्येकालाच वाटते.





कमला यांचा विजय हा केवळ अमेरिकेसाठीच महत्वाचा नाही तर तो थुलसेंद्रपूरमसाठीही महत्वाचा आहे असे एका गावकऱ्याने सांगितले. कमला या थुलसेंद्रपूरमची 'लेक' असल्याची भावना इथल्या प्रत्येकाची आहे. तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर कमला त्यांच्या मूळ गावी येतील आणि आम्हाला भेटतील अशी आशा अनेक गावकरी व्यक्त करत आहेत.


हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला आहे. त्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या आणि तिकडेच स्थायिक झाल्या. कमला यांना घेऊन त्या नेहमी आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात यायच्या. कमला यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन हे नंतरच्या काळात चेन्नईला स्थायिक झाले. आपण पाच वर्षाचे असताना आजोबांसोबत थुलसेद्रपूरम या मूळ गावी फेरफटका मारल्याचे कमला यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन सांगितले होते.


महत्वाच्या बातम्या:



US Election Result : बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात


US Elections Result: अजून 'या' राज्यांचे निकाल बाकी, आतापर्यंत ट्रम्प आणि बायडन कुठं-कुठं जिंकले


US Election Result : बायडन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड; अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार