नवी दिल्ली : दिल्लीच्या सब्जी मंडई रेल्वे स्टेशनवर तरुणाला 1500 रुपयांची उधारी परत न केल्याने, बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण राहुल जहांगीरपुरी परिसरात रहात होता. त्याची आई आझादपूर भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करत असे. गुरुवारी राहुलचा तीन तरुणांमसोबत वाद झाला. या वादाचं पर्यवासनं जोरदार हाणामारीत झालं.

यानंतर राहुलने स्वत: चा बचाव करत तिथून पळ काढला, आणि सब्जी मंडई रेल्वे स्टेशनच्या गाठलं. यानंतर या घटनेतील तिन्ही आरोपीही त्याचा पाठलाग करत सब्जी मंडई रेल्वे स्टेशनवर पोहोचले, आणि त्याला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.

राहुलला मारहाण करताना पाहून रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पण पोलिसांच्या पथकाने तिघांचा पाठलाग करुन आरोपींना बेड्या ठोकल्या.

यानंतर जखमी अवस्थेतील राहुलला, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेतील पोलिसांनी अटक केलेल्या इतर दोन तरुणांची सखोल चौकशी केली असता, राहुलने त्याच्याकडून 1500 रुपये उधार घेतले होते. पण त्याने वेळेत परत न केल्याने त्याची हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं.