Skymet Monsoon Forecast 2022 : मुंबई : हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला आहे. यंदा मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता आहे. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्त एरर मार्जिन आहे. स्कायमेटने यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यामध्ये यावर्षी मान्सून सामान्य असेल असं सांगितलं होतं. स्कायमेटने आज पुन्हा एकदा आपल्या अंदाजाचा पुनरुच्चार केला आहे.


देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच, पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतही त्याचा खोलवर परिणाम होतो. भारतीय हवामान विभाग या महिन्याच्या अखेरीस आपला अंदाज जाहीर करेल.






या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका
दरम्यान राजस्थान आणि गुजरातसह नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे. याशिवाय जुलै-ऑगस्ट महिन्यात केरळ आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात पावसात थोडीशी घट होऊ शकते. स्कायमेटच्या मते, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील कृषी क्षेत्र, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.


पावसाळ्याचा पूर्वार्ध उत्तरार्धापेक्षा चांगला असेल अशी अपेक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची एन्ट्री दमदार असेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.


कोणत्या महिन्यात किती पाऊस अपेक्षित?


जूनमध्ये 
70% सामान्य पावसाचा अंदाज
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 20% जास्त
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 10% कमी


जुलैमध्ये 
65% सामान्य पावसाचा अंदाज
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 20% जास्त
15% सामान्य कमी पावसाचा अंदाज


ऑगस्टमध्ये 
60% सामान्य पावसाचा अंदाज
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 10% जास्त
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 30% जास्त


सप्टेंबरमध्ये 
20% सामान्य पावसाचा अंदाज
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 10% जास्त
सामान्य पावसाच्या अंदाजापेक्षा 70% कमी


अर्थव्यवस्थेवर मान्सूनचा परिणाम कसा?
खराब पावसामुळे पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात. त्यामुळे सर्वसामान्यांची खर्च करण्याची क्षमता कमी होते आणि त्यानुसार बचत आणि गुंतवणूकही कमी होते. खराब मान्सूनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे आणि त्याचा परिणाम FMCG, ग्राहकोपयोगी वस्तू, दुचाकी, ट्रॅक्टर आणि सोन्याच्या मागणीवर दिसून येत आहे. ब्रोकरेज कंपन्या एफएमसीजी, ऑटो अँड इंजिनीअरिंग, बँकिंग, एनबीएफसी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मान्सून खराब होताच गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देतात. अशाप्रकारे, मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असल्याचे दिसून येते आणि त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांच्या वैयक्तिक उत्पन्नावर आणि बचतीवर होतो.