नवी दिल्ली : दिल्लीतील अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावरुन उडी मारलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. घटनेदरम्यान चादर घेऊन उभ्या असलेल्या जवानांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुमारे 40 फूट उंचीवरुन तिने उडी मारली होती. मृत तरुणी ही पंजाबमधील असल्याचं कळतं. तिचं वय साधारण 20 ते 22 वर्षे असावं असं अंदाज वर्तवला जात आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काल (14 एप्रिल) सकाळी साडेसातच्या सुमारास अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या छतावर एक तरुणी उभी असल्याचं प्रवाशांनी पाहिलं. त्यांनी याची माहिती सीआयएसएफ जवानांना दिली. तिला मेट्रो स्टेशनच्या गच्चीवर पाहून सर्व सीआयएसएफ जवान आश्चर्यचकित झाले आणि तिला उडी न मारण्याचं आवाहन करत होते. मात्र सर्व प्रयत्न करुनही तरुणीने छतावरुन उडी मारली. मुलीने उडी मारली तेव्हा सीआयएसएफचे काही जवान खाली चादर घेऊन उभे होते. मुलीने उडी मारली तर तिला पकडले जाईल, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र धडक एवढी जोरदार होती की तरुणी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ लाल बहादूर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
ती तरुणी मूकबधिर होती. त्यामुळे तिने कोणत्या कारणास्तव उडी मारली, एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खरंतर घटनेच्या वेळी सीआयएसएफ जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाचं सर्वजण नक्कीच कौतुक करत होते. त्यांनी ज्या पद्धतीने तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता ते पाहून सर्व प्रभावित झाले होतं. मात्र रात्री उशिरा तरुणीचा लाल बहादूर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अद्याप रुग्णालयाने या संदर्भात कोणतेही तपशीलवार वक्तव्य जारी केलेलं नाही. प्राथमिक उपचारानंतर मुलीच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं. तसंच शरीराच्या इतर काही भागात जखमा होत्या. मात्र त्यानंतर परिस्थिती ठीक असल्याचे सांगण्यात आले. आता रात्री उशिरा मुलीचा मृत्यू झाला.