नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीवरुन सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाची (Voting) टक्केवारी व आकडेवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, आज लोकसभा (Loksabha Eelction) निवडणुकांच्या 6 व्या टप्प्यात 58 जागांवर मतदान घेण्यात येत आहे. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आत्तापर्यंतच्या मतदानाची टक्केवारी अखेर जाहीर केली आहे. गेल्या 5 टप्प्यात देशात झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले, याची इतंभू माहितीच आयोगाने दिली आहे. तसेच, मतदान टक्केवारीवरुन काही चुकीचे गैरसमज पसरवले जात असल्याचंही आयोगाने म्हटले आहे.


आयोगाने 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी, तर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती. त्यात प्रारंभीची टक्केवारी व अंतिम टक्केवारीमध्ये 5.75 टक्क्यांची तफावत आढळून आली. त्यामुळे, आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स व कॉमन कॉज यांनी संयुक्तपणे, तसेच मोहुआ मोईत्रा यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.  त्यावर, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, आता निवडणूक आयोगानेच पहिल्या 5 टप्प्यातील मतदानाची संपूर्ण आकडेवारी जारी केली आहे. 


निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत झालेल्या सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जारी केली. तसेच, निवडणूक प्रक्रियेला खराब करण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक चुकीचा समज पसरवला जात आहे. आयोगाच्या अॅपवर सकाळी 9.30 वाजल्यापासून मतदानाची टक्केवारी अपडेट होत असते, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच, आयोगाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून मतदान टक्केवारीत कुठलाही बदल झाला नसल्याचेही सांगितले. 


निवडणूक आयोगाकडून जारी केलेली टक्केवारी


पहिला टप्पा - 66.14 टक्के
दुसरी टप्पा - 66.71 टक्के
तिसरा टप्पा - 65.68 टक्के
चौथा टप्पा - 69.16 टक्के
पाचवा टप्पा - 62.20  टक्के


न्यायालयाने काय म्हटलं?


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, शनिवारी सहाव्या टप्प्याचे मतदान आहे. अशा स्थितीत मतदानकेंद्रनिहाय मतदानाची प्रमाणित आकडेवारी 48 तासांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाला देता येणार नाहीत, कारण आयोगाला डेटा अपलोड करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जमवणे अवघड ठरेल, असे न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या अवकाशकालीन खंपीठाने याचिकेवरील सुनावणीवेळी नमूद केले.


जितेंद्र आव्हाडांचे ट्विट


जनतेचा दबाव लोकशाहीमध्ये काय करू शकतो, हे आज दिसून आले. ज्या टप्प्या - टप्प्यात मतदान झाले. त्या मतांची एकत्रित आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. जनतेमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रोष वाढत चालला होता. जनतेचा आपल्यावरील विश्वास उडू लागलाय, हे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने आज दुपारी अचानक हे पाऊल उचलले. जनता एकत्र आली तर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पण काही मतदार संघा मध्ये ElectionAgent ला 17 सी फॉर्म देण्यात आले नाहीत ते प्रत्येक उमेदवाराला देण्यात यावीत, असे ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.