India Weather : देशातील तापमानात (Temperature) सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा कहर आहे तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर पाहायला मिळत आहे. देशातील अनेक भागात सध्या तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे. सध्या उत्तर भारत चांगलाच तापला असून उष्णतेची लाट आली आहे. हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे.


या राज्यात उष्णतेचा रेड अलर्ट 


सध्या संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेने तीव्र स्वरुप धारण केले आहे. कडक उन्हामुळं सर्वत्र नागरिकांचे हाल होत आहेत. प्रत्येक घरात लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. हवामान खात्याने दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केलाय. येणाऱ्या नऊ दिवस सर्व राज्यांमध्ये अत्यंत उष्ण असू शकतात. 


राजस्थानमधील फलोदी शहर ठरले सर्वाधिक उष्ण शहर
 
राजस्थानमधील फलोदी शहर सर्वाधिक उष्ण ठरले आहे. या शहरात तापमानाचा पारा 49 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सॉल्ट सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर मे-जून दरम्यान देशातील सर्वात उष्ण क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट आहे. अनेकवेळा उन्हाळ्यात तापमानाचा पारा 51 अंशांपर्यंत जातो. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या बाडमेर, जैसलमेर आणि श्रीगंगानगरसारख्या शहरांमध्ये तापमान 48 ते 49 अंशांवर पोहोचले आहे.


राजगड हे देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर


राजस्थानमधील फलोदीनंतर, राजगड हे देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर आणि मध्य प्रदेश राज्यातील सर्वात उष्ण शहर होते. शुक्रवारी येथील तापमान 46.3 अंश होते. यानंतर महाराष्ट्रातील अकोला, गुजरातमधील अहमदाबाद आणि हरियाणातील सिरसा शहराचे तापमान 45 अंशांच्या पुढे राहिले. ही तिन्ही शहरे आपापल्या राज्यातील सर्वात उष्ण शहरे होती. ओराई हे यूपीचे सर्वात उष्ण शहर होते. येथील तापमान 43.8 अंश होते तर फिरोजपूर 43.5 अंशांसह पंजाबमधील सर्वात उष्ण शहर होते.


दिल्ली देखील तापमानाचा पारा वाढला


दिल्ली देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. दिल्लीचे कमाल तापमान हे 41.7 अंश होते. या आठवड्यात येथे कमाल तापमान 43 ते 45 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 मे रोजी दिल्लीचे तापमान 44 अंशांपर्यंत राहू शकते. 27 आणि 28 मे रोजी 45 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.