PM Modi At NCC Event: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (28 जानेवारी) दिल्लीतील करिअप्पा मैदानावर नॅशनल कॅडेट कॉर्प्सना (NCC) संबोधित केलं. "आज महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपत राय यांची जयंती आहे. आज फील्ड मार्शल करिअप्पा यांची जयंती आहे. देशाच्या या दोन महान सुपुत्रांना मी अभिवादन करतो. देश आज स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. मी करिअप्पा मैदानावर भारताची युवा शक्ती पाहत आहे. जे 2047 मध्ये भारताला शंभर वर्षे पूर्ण करून भव्य भारताची निर्मिती करेल आणि या भारतामध्ये देशाच्या मुलींचं मोठं योगदान असेल. मला अभिमान आहे की मी देखील एनसीसीचा सक्रिय कॅडेट होते", असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 


पंतप्रधान म्हणाले की, एनसीसीमध्ये मला जे प्रशिक्षण मिळालं, जे शिकायला मिळालं, त्यातून आज देशाप्रती असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला प्रचंड बळ मिळालं. काही दिवसांपूर्वी मला एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांचं कार्डही मिळालं. आज जेव्हा देश नवनवीन संकल्पना घेऊन पुढे जात आहे, तेव्हा देशात एनसीसी मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.


देशात उच्चस्तरीय आढावा समिती स्थापन करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत आम्ही देशाच्या सीमावर्ती भागात एक लाख नवीन कॅडेट तयार केले. आता देशातील मुली सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. लष्करात महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळत आहेत. देशाच्या कन्या हवाई दलात लढाऊ विमाने उडवत आहेत. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त मुलींचा एनसीसीमध्ये समावेश व्हावा, हा आमचा प्रयत्न असायला हवा.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स च्या तुकडींचीही पाहणी केली. पाहणीपूर्वी करिअप्पा मैदानावर पंतप्रधानांना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केल्यानंतर पंतप्रधानांनी एनसीसीच्या तुकडीच्या मार्चपास्टचाही आढावा घेतला.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha