Covid19 Guidelines Extended : देशात कोरानाचा (Coronavirus) कहर सुरुच आहे. ओमायक्रॉन (Omicron) प्रकारही सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविडशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहेत. यासोबतच केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करण्यास सांगितले आहे. गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचे नवीन प्रकार, ओमायक्रॉन प्रकारामुळे देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Continues below advertisement


अजय भल्ला म्हणाले की, ''बहुतेक कोरोना रुग्ण वेगाने बरे होत आहेत आणि रुग्णालयांमध्ये कमी रुग्ण असले, तरीही कोरोना रुग्णवाढीचा दर अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे की 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 407 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक सकारात्मकता दर आहे. त्यामुळे कोविड विषाणूचा संसर्ग पाहता सावधगिरी बाळगण्याची आणि दक्षता घेण्याची गरज आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारीचे पालन करावे आणि कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा होऊ देऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे.


गृह सचिव यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यांनी कोविड संबंधित नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये मास्क घालणे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी, मेळाव्यात सुरक्षित सामाजिक अंतर राखणे या नियमांचा समावेश आहे. याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी योग्य माहिती आणि चुकीच्या माहितीबद्दल लोकांमध्ये पसरवलेले गैरसमज दूर करण्यासाठी नियमितपणे मीडिया ब्रीफिंग सुरू ठेवावे. टेस्टींग-ट्रॅकींग-ट्रीटमेंट-लसीकरण आणि कोविडच्या नियमांचे पालन करणे सुरू ठेवावे.


गृह सचिवांनी मुख्य सचिवांना जिल्ह्यांना आणि इतर सर्व संबंधित स्थानिक प्राधिकरणांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यास सांगितले आहे. यामुळे मंत्रालयाच्या सल्ल्यांचे काटेकोर पालन करण्यासह कोरोनाच्या जलद आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात मदत होईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha