Student's Bihar Bandh: रेल्वे परिक्षेच्या प्रक्रियेतील कथीत अनियमिततेबद्दल बिहारमध्ये विद्यार्थी चागलेच आक्रमक झाले आहे. याविरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी संघ (AISA) यांच्या वतीने बिहार बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच आज विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला सुरूवात केली आहे. हाजीपूरमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने निदर्शने करण्यात येत आहेत. निदर्शने करण्यासाठी शेकडो लोक गांधी सेतू पुलावर पोहोचले आहेत. तर समस्तीपूरमध्येही निदर्शने सुरू आहेत. राजद आणि पप्पू यादव यांच्या जनाधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. जदरम्यान, पटना येथील खान सरांनी विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. खान सरांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेक पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर टायरची जाळपोळ केली जात आहे. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील होत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. त्याचबरोबर पटना शहराशी जोडणाऱ्या महात्मा गांधी सेतू पूल देखील जन अधिकार पक्षाच्या समर्थकांनी बंद केला आहे. जन अधिकार पक्षाचे समर्थक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी संघ (AISA) रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबद्दल सातत्याने आंदोलन करत आहे. विद्यार्थ्यांच्या बिहार बंदच्या घोषणेला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी याबाबत निवेदन जारी केले आहे.
बिहारमधील विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा भाग असलेल्या आरजेडी, काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय(एम) यांनी गुरुवारी संयुक्तपणे एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये "बिहारमध्ये देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे आणि बेरोजगारीचा दर देखील सर्वाधिक आहे. केंद्र आणि बिहार सरकारकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. सरकार त्यांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत असते, पण जेव्हा ते नोकरीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा नितीश कुमार सरकार त्यांच्यावर लाठीचा वर्षाव करते, असे या निवेदनात म्हटले आहे. केंद्रातील एनडीए सरकारला उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीची जास्त काळजी असून, आंदोलक विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. 28 जानेवारी ला विद्यार्थी संघटनेने पुकारलेल्या बिहार बंदला महाआघाडीतील सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलिसांनी विद्यार्थ्यांवर किंवा कोचिंग संस्थांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी आमची मागणीही करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: