अलाहाबाद हायकोर्टाने 12 ऑक्टोबर 2017 रोजी राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते. नोंद झालेल्या साक्षींच्या आधारे तलवार दाम्पत्याला दोषी ठरवणं शक्य नाही, असे म्हणत अलाहाबाद हायकोर्टाने आरोपमुक्त केले होते.
अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात हेमराज यांची पत्नी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टात गेली होती. त्यानंतर आता सीबीआयनेही सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहेत.
गाजियाबादमध्ये सीबीआयच्या कोर्टाने 26 ऑक्टोबर 2013 रोजी तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत, राजेश आणि नुपूर तलवार हे गाजियाबादच्या डासना तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. मात्र नंतर अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दाम्पत्याला आरोपमुक्त केले.
तलवार दाम्पत्याची 14 वर्षीय मुलगी आरुषी मे 2008 मध्ये नोएडास्थित त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर नोकर हेमराजचा मृतदेहही त्याच घरी सापडला होता.