आगरतळा : त्रिपुरामध्ये आज भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर डाव्यांची सत्ता बदलली आहे. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
त्रिपुराचे भापजचे प्रदेश अध्यक्ष विल्पव कुमार देव हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज (शुक्रवार) दुपारी 12 वाजता असम रायफल्स मैदानात हा शपथविधी पार पडणार आहे.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
कोण आहेत विप्लव देव?
48 वर्षीय विप्लव देब यांनी आपली राजकीय कारकीर्द दिल्लीतून सुरु केली होती. सर्वात आधी ते संघाचे स्वयंसेवक होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- दक्षिण त्रिपुरातील उदयपूरमध्ये विप्लव देव यांचा जन्म
- 1998 मध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर ते दिल्लीत गेले.
- 1998 ते 2015 पर्यंत ते दिल्लीतच राहिले.
- 2015 साली विप्लव देव यांच्यावर त्रिपुराची जबाबदारी सोपवण्यात आली.
- जानेवारी 2016 साली त्यांची त्रिपुराच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.