मुंबई : अणुबॉम्ब वापरासंबंधातील भारताच्या धोरणाला छेद देणारं वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं आहे. गरज पडल्यास भारतही पहिल्यांचा अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे संकेत मनोहर पर्रिकर यांनी दिले. पण त्याचबरोबर भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही, असंही ते म्हणाले.


निवृत्त ब्रिगेडियर गुरमीच कंवल यांच्या 'द न्यू अर्थशास्त्र' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मनोहर पर्रिकर बोलत होते.

"भारत पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर करणार नाही, असा एक समज आहे. पण मला या विचारात अडकून बसायचे नाही. गरज पडली तर भारतही पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करु शकतो. पण भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही," असं पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं.

'अण्वस्त्र वापराबाबतचं वक्तव्य वैयक्तिक'

मात्र यानंतर लगेचच पर्रिकर म्हणाले की, "हे माझं वैयक्तिक मत आहे. नाहीतर उद्या अशी बातमी पसरवली जाईल की, पर्रिकर यांनी भारताच्या आण्विक धोरणात बदल केला आहे. पण सरकारने यात कोणताही बदल केलेला नाही. हा माझा वैयक्तिक विचार आहेत."

यानंतर सरकारने आण्विक धोरणात कोणताही बदल केला नसल्याचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही दिलं.

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या धमक्या बंद!

"भारताकडून सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास रणनीती आखून अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, अशी धमकी पाकिस्तान सातत्याने देत आहे. परंतु सर्जिकल स्ट्राईकनंतर या धमक्या बंद झाल्या," असा दावाही पर्रिकर यांनी केला.

भारताचं 'नो फर्स्ट यूज' धोरण

भारताने 1998 मध्ये अणुचाचणी केली होती. यानंतर भारताने अण्वस्त्रांच्या वापराबाबत 'नो फर्स्ट यूज' (NFU) हे धोरण अवलंबलं. या धोरणानुसार, जोपर्यंत कोणता देश भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करत नाही, तोपर्यंत भारतही हल्ला करणार नाही. हे धोरण केमिकल आणि बायोलॉजिकल शस्त्रांवर लागू होतं. पण पाकिस्तानने असं कोणतंही धोरण आखलेलं नाही.

दरम्यान, भारताच्या आण्विक धोरणावर फेरविचार करु, असं आश्वासन भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी दिलं होतं. मात्र अजूनही त्याचा ना उल्लेख झाला, ना त्यात कोणताही बदल झाला.

'नो फर्स्ट यूज'चा त्याग करा : जसवंत सिंह

2003 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी या धोरणात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यास नकार दिला होता. तर भारताला 'नो फर्स्ट यूज' धोरणाचा त्याग करायला हवा, असं मत भाजप नेते जसवंत सिंह 2011 मध्ये व्यक्त केलं होतं.

 

विरोधकांची पर्रिकरांवर टीका

मनोहर पर्रिकर यांच्या या विधानावर विरोधक त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेते रणदीप सुरेजवाला म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात अशाप्रकारचं विधान करायला नको होतं. तर संरक्षण मंत्र्यांचं आतापर्यंतच सर्वात बेजबाबदार विधान आहे, अशी टीका सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनी केली.