NCERT Books: राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (National Council of Educational Research and Training -NCERT) बारावीच्या पुस्तकात केलेल्या बदलामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. NCERT ने आपल्या पुस्तकांमध्ये मोठा बदल केला असल्याचे वृत्त आहे. यामध्ये महात्मा गांधी यांनी धार्मिक सलोख्यासाठी केलेले प्रयत्न, महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेली बंदी आदी भाग वगळण्यात आला आहे.
NCERT ने इयत्ता बारावीच्या इतिहास, नागरीक शास्त्र आणि हिंदीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल केले असल्याचे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे. NCERT ने या बदलाच्या अनुषंगाने शाळांना माहिती देण्यासह आपल्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्यात आली होती. मागील वर्षी पुस्तकांची छपाई झाली नव्हती. मात्र, यावर्षी छपाई झाली. त्यानंतरही बाब समोर आली असल्याचे म्हटले जात आहे. या पुस्तकात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेशी संबंधित वाक्य, संदर्भ हटवण्यात आले असल्याचे समोर आले.
मागील 15 वर्षांपासून वगळण्यात आलेला मजकूर पुस्तकात होता. त्यानंतर आता, त्यात बदल करण्यात आले आहेत.
'इंडियन एक्स्प्रेस'ने NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांना याबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की पुस्तकात झालेले बदल हे 2022 मध्ये झाले होते. आम्ही यावर्षी कोणतेही बदल केले नाहीत. जे काही बदल झाले ते मागील वर्षी करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
NCERT च्या पुस्तकातून कोणता भाग वगळण्यात आला?
"पाकिस्तान जसा मुस्लिमांचा देश आहे तसाच भारताने बदला घ्यावा किंवा भारत हा हिंदूंचा देश असावा असे मानणाऱ्यांना महात्मा गांधी आवडत नव्हते."
"हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी महात्मा गांधींच्या प्रयत्नांमुळे हिंदू कट्टरतावादी गटाला इतके चिथावले गेले की त्यांनी गांधीजींच्या हत्येचे अनेक प्रयत्न केले."
"गांधीजींच्या हत्येचा देशाच्या सांप्रदायिक परिस्थितीवर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, भारत सरकारने जातीय द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सारख्या संघटनांवर काही काळ बंदी घालण्यात आली. गेली."
पुस्तकातून एका धड्यातील गुजरात दंगलीवरील एक भाग वगळण्यात आला. यामध्ये निवासी भागात धर्म, जाती आणि वर्णाच्या आधारे वस्ती वसवली जात असते आणि 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर धर्म, जातीच्या आधारे लोकांमध्ये दुरावा वाढत चालला असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. नव्या पुस्तकात या उताऱ्यासह इयत्ता सहावी ते 12 वी पर्यंतच्या समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमातून गुजरात दंगलीशी संबंधित माहिती हटवण्यात आली.
मुघल आणि जातिव्यवस्थेशी संबंधित भागही काढून टाकण्यात आले.
इंडियन एक्स्प्रेसच्या आणखी एका लेखात असे लिहिले आहे की, महात्मा गांधींशी संबंधित तथ्यांव्यतिरिक्त मुघल आणि जातिव्यवस्थेशी संबंधित भागही नवीन पुस्तकांमधून काढून टाकण्यात आले आहेत.
दिल्ली सल्तनतच्या (मामलुक, तुघलक, खिलजी, लोधी आणि मुघल) शासकांशी संबंधित अनेक विभाग इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून गहाळ झाले आहेत. तसेच हुमायून, शाहजहान, बाबर, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारा तक्ताही काढला.
>> हे प्रकरण काढून टाकण्यात आले
> इयत्ता 12वीच्या पुस्तकातून 'किंग्स अँड क्रॉनिकल्स: द मुगल कोर्ट' हे प्रकरण काढून टाकण्यात आले आहे.
> सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याचा धडा इयत्ता 7वीच्या NCERT पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे. त्याच वेळी, अफगाणिस्तानच्या मोहम्मद गझनीच्या हल्ल्याची वस्तुस्थिती देखील छेडछाड करून बदलण्यात आली आहे. पुस्तकात त्याच्या नावातून 'सुलतान' हा शब्द काढून टाकण्यात आला आहे आणि त्याच प्रकरणामध्ये जिथे त्याने 'जवळपास दरवर्षी भारतावर आक्रमण केले' असे नमूद केले आहे. त्याच्या जागी 'भारतावर 1000 ते 1025 च्या दरम्यान धार्मिक हेतूने 17 वेळा आक्रमण केले' असे लिहिले आहे.
> 12वी NCERT मध्ये आणीबाणी आणि त्याचे परिणाम यावरील विभाग फक्त पाच पानांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
> इयत्ता 6वीच्या पुस्तकात 'वर्णा'चा भाग अर्धा करण्यात आला आहे आणि सहावी ते 12वीच्या पुस्तकातून सामाजिक चळवळीशी संबंधित तीन प्रकरणं काढून टाकण्यात आले आहेत.