भोपाळ : मध्य प्रदेशात भोपाळ–उज्जैन ट्रेनमध्ये सकाळी झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता. या प्रकरणी मध्य प्रदेशातील पिपारीया येथून तीन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली आहे.


या हल्ल्यात सात प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यात स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांताने चालू ट्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. जे प्रवासी अडकले ते जखमी झाले.

दरम्यान ट्रेनमध्ये गन पावडर मिळाल्याने हा दहशतवादी हल्ला असू शकतो, अशी शंका सकाळीच वर्तवण्यात आली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक मकरंद देवस्कर यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

संबंधित बातमी : उत्तर प्रदेश एटीएस आणि संशयित दहशतवाद्यात चकमक