लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊतील ठाकूरगंजमध्ये एक संशयित दहशतवादी आणि एटीएसमध्ये जोरदार चकमक सुरु आहे. उत्तर प्रदेश एटीएसने संशयित दहशतवाद्याला घेरलं असून सहा तासांपासून गोळीबार चालू आहे.


दहशतवाद ज्या घरात लपले आहेत, त्या घराचं छप फोडून पोलिसांनी पाहणी केली असता एकापेक्षा अधिक दहशतवादी असल्याचं दिसून आलं. त्यामुळे कमीत कमी दोन दहशतवादी लपले असल्याची पोलिसांना शंका आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी गृहमंत्रालयाला दिलेल्या माहितीनुसार आज मध्यप्रदेशात झालेल्या भोपाळ-उज्जैन ट्रेन ब्लास्टसोबत या दहशतवाद्याचा संबंध आहे. सैफुल असं एका दहशतवाद्याचं नाव सांगितलं जात आहे. त्याने स्वतःला घरात बंद करुन घेतल्याने एटीएस आणि पोलिसांकडून त्याला जिवंत पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

केरळ एटीएसकडून उत्तर प्रदेश एटीएसला या दहशतवाद्याविषयी माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर उत्तर प्रदेश एटीएसने ठाकूरगंज भागातील एका घरात या दहशतवाद्याला घेरलं.

संशयित दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात दारु गोळा आणि शस्त्र असण्याची शक्यता आहे. तर पोलिसांनी आणि एटीएसनेही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. ठाकूरगंज हा वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. इथून उत्तर प्रदेश विधानसभा 8 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचं वातावरण असल्याने हे प्रकरण गंभीर मानलं जात आहे.

संबंधित बातमी : भोपाळ-उज्जैन ट्रेनवर दहशतवादी हल्ला, 7 जण जखमी