मुंबई : मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर खात्यानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने हायअलर्ट जारी केला आहे.


महत्त्वाच्या बाजारपेठा, रेल्वेस्टेशन, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जावू शकतं अशी माहिती गुप्तचर खात्याच्या सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर 80 पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. एनएसजी कमांडो टीमही दहशतवादी हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांनी मोठ्या हल्ल्याची योजना केल्याची बाब समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर संघटनांनी दहशतवाद्यांचा एक कॉल रेकॉर्ड केला आहे.

ऑईल रिफायनरींवरही हल्ल्याची शक्यता 

दहशतवाद्यांनी यावेळी ऑईल रिफायनरींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे सर्व रिफायनरीना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही दिले आहेत. गुप्तचर संघटनांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी राजस्थान, पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील ऑईल रिफायनरींना लक्ष्य करणार आहेत.

दहशतवादी हल्ल्याच्या माहितीनंतर गुप्तचर खात्याने गृह मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाला निर्देश दिले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसुचनेनंतर गृहमंत्रालयाने हायअलर्ट जारी केला आहे.