नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याच्या संशयामुळे देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब बॉर्डरमार्गे काही दहशतवादी दिल्लीला येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 6-7 अतिरेकी दिल्लीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी पंजाबच्या फिरोजपूर परिसरात ते दाखल होणार असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना अलर्ट देण्यात आला आहे. काल सकाळी शस्त्रास्त्रांनी सज्ज असे चार दहशतवादी जम्मूमधून एक इनोवा कार घेऊन पळाले. ती कार घेऊन ते लोक पंजाबच्या दिशेने गेले. हे लोक पंजाबच्या फिरोजपूर सीमा भागात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराने फिरोजपूर येथील सीमा भाग सील केला आहे. शिवाय सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे.
पंजाब पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 6-7 दहशतवादी पंजाबमार्गे दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे पंजाबमधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे.