नवी दिल्ली : भारताचा स्प्रिंटर (धावपटू) परविंदर चौधरी याने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु (जेएलएन) स्टेडियममध्ये आत्महत्या केली आहे. स्टेडियममधील अॅथलेटिक्स अॅकॅडमीच्या होस्टेलमधील त्याच्या रुममध्ये पंख्याला लटकून त्याने आयुष्य संपवलं आहे. १८ वर्षीय परविंदर चौधरी मूळचा अलीगडमधील इगलास येथे राहणारा आहे. १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौधरीने भारताचे प्रितिनिधीत्व केले आहे. मागील वर्षीच्या युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण जिंकले होते. याशिवाय युवा विश्व चॅम्पियनशिपमध्येही तो सहभागी झाला होता. परविंदरने गळफास घेतल्याचे त्याच्या सहकाऱ्यांना समजले. त्यानंतर त्यांनी त्याला सफदरजंग येथील इस्पितळात नेले. डॉक्टरांनी परविंदरचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगत मृत घोषित केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) सांगण्यात आले आहे की, ‘सदर घटना आमच्या आवारात झाल्याने विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय साईने त्यांचे सचिव स्वर्णसिंग छाब्रा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आहे, जी या घटनेचा तपास करेल. ही समिती एक आठवड्यानंतर त्यांचा अहवाल सादर करणार आहे. परविंदरच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे त्याच्या वडिलांशी भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे.