काश्मीरप्रश्नी शाहिद आफ्रिदी म्हणतोय ते खरंच : राजनाथ सिंह
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2018 01:16 PM (IST)
छत्तीसगड येथील एका सभेत बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आफ्रिदीचे समर्थन केले आहे. यावेळी सिंह म्हणाले की, आफ्रिदीने काश्मीरबाबत केलेले वक्तव्य योग्यच आहे.
रायपूर : काश्मीर प्रश्नावर नेहमीच व्यक्त होणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने काल एक खळबळजनक वक्तव्य करत पाकिस्तान सरकारला घरचा आहेर दिला. आफ्रिदी म्हणाला कि, "पाकिस्तान सरकार स्वताःचा देश सांभाळू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरची मागणी करु नये". केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी छत्तीसगड येथील एका सभेत बोलताना आफ्रिदीचे समर्थन केले आहे. यावेळी सिंह म्हणाले की, आफ्रिदीने काश्मीरबाबत केलेले वक्तव्य योग्य आहे. काय म्हणाला होता आफ्रिदी आफ्रिदी म्हणाला की, “स्वतःचा देश सांभाळणे पाकला जड जात आहे. अशा वेळी काश्मीरची मागणी करणे योग्य नाही. तसेच काश्मीरचा भारतातही समावेश केला जाऊ नये. त्याऐवजी काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करावे. पाकिस्तानला काश्मीर नको, भारतालाही काश्मीर देऊ नका, काश्मीरला वेगळ्या देशाचा दर्जा द्या. म्हणजे किमान तिथली माणुसकी तरी जिवंत राहील. जी माणसं मरताहेत ती तरी मरणार नाही.'' यावर आज राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आफ्रिदी बरोबर बोलला आहे. ते लोक (पाकिस्तान सरकार) पाकिस्तानला नाही सांभाळू शकत नाही. काश्मीर काय सांभाळणार? काश्मीर भारताचा हिस्सा होता, आहे आणि रहील.”