पणजी : गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी करुन भाजप सरकार भक्कम करण्याच्या झालेल्या हालचालींमुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे.
काँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळणकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत आणि अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तेवढे काँग्रेसमध्ये राहिले आहेत.
नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रिपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपाने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचा गट फुटण्यास गेल्या महिन्यात तयार झाला होता पण भाजपच्या स्तरावरुन निर्णय झाला नव्हता.
भाजपचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. भाजपच्या अत्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी संध्याकाळी पणजीमध्ये बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व दहा आमदारांनी पक्षापासून फारकत घ्यावी आणि स्वतंत्र गट स्थापन करुन मग भाजपमध्ये विलीन व्हावे अशा प्रकारचा निर्णय झाला. कवळेकर यांनीही त्याचवेळी स्वतंत्रपणे काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक घेतली.
काँग्रेसच्या आमदारांपैकी काही जणांना मंत्रिपदे देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी काही जणांना वगळले जाईल, अशीही माहिती भाजपच्या गोटातून प्राप्त झाली. काँग्रेसपासून फुटून वेगळे झालेले सर्व आमदार दिल्लीस रवाना झाले असून ते पक्षाध्यक्ष आणि इतर प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत.
गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2019 10:42 PM (IST)
काँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -