बडोदा : घाई घडबडीत असताना बऱ्याचदा बँकेकडून लोनची विचारणा करणारे किंवा एखाद्या टेलिकॉम कंपनीच्या ऑफरचे फोन कॉल येत असतात. अशाचप्रकारे नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराची तयारी करणाऱ्या व्यक्तीला कॉल करणं 'आयक्युब' फायनान्स कंपनीला चांगलंच महागात पडलं आहे.


बडोद्यातील तक्रारदार 20 जानेवारी 2007 रोजी चुलतभावाच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होता. यावेळी 'आयक्युब'कडून एका पर्सनल लोनसाठी त्यांना फोन आला. आपण सिटीबँकेतर्फे बोलत असून तुमचं कर्ज मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे चिडलेल्या तक्रारदाराने बडोद्यातील स्थानिक ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

संबंधित फोनमुळे आपल्याला चुलतभावाच्या अंतिम संस्कारांची तयारी करताना मनस्तापाला सामोरं जावं लागलं, त्याचप्रमाणे विधींकडे आपलं दुर्लक्ष झालं, असा दावा तक्रारदाराने केला. अशा प्रकारचा फोन कॉल म्हणजे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि ट्रायच्या नियमांचं उल्लंघन असल्याचंही त्याने तक्रारीत म्हटलं. कर्जासाठी अर्ज न करताही संकट काळात असताना आपल्याला फोन करुन त्रास दिल्याचं त्याने म्हटलं होतं.

ग्राहक न्यायालयाने केलेल्या चौकशीत तक्रारदाराला त्यावेळी फोन करुन कर्जाची माहिती दिल्याचं सिद्ध झालं.
त्यानंतर टेलिकॉलर फर्म आयक्युब कंपनी आणि पर्सनल लोन तसंच सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी फोन करणारा कॉलर कन्हैयालाल ठक्करला प्रत्येकी 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वोडाफोन एस्सार गुजरात लिमिटेड कंपनीलाही ग्राहक कल्याण निधीला दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकाचा सेल फोन नंबर आणि वैयक्तिक तपशील टेलिकॉलर फर्मसोबत शेअर करणं, हा गोपनीयतेचा भंग असल्याचं तक्रारदाराने म्हटलं होतं.