नवी दिल्ली : सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कोळसा घोटाळ्यातील तपासात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सिन्हा यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिन्हा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांपूर्वी सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
रणजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं मत सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठाने नोंदवलं होतं. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे विशेष संचालक एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
कोळसा घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान सिन्हा यांनी आरोपींची भेट घेतली होती. आरोपींमध्ये राजकीय नेते आणि उद्योजकांचा समावेश होता. या भेटी सिन्हा यांच्या शासकीय निवासस्थानी होत असत.
रणजित सिन्हा हे 2012 ते 2014 या कालावधीत सीबीआयचे संचालक होते. सिन्हा हे 1974 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
विशेष म्हणजे सीबीआयच्या माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही या वर्षातली दुसरी घटना आहे. फेब्रुवारी महिन्यात सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.