Hyderabad News : वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहिण वायएस शर्मिला (YS Sharmila) यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी (24 एप्रिल) आंदोलनादरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शर्मिला यांना हैदराबादमधील जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


शर्मिला यांना विशेष तपास पथकाच्या (SIT) कार्यालयात जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. भरती परीक्षेच्या कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. ही परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाने आयोजित केली होती.


शर्मिला यांचं पोलिसांसोबत गैरवर्तन, धक्काबुक्की करत कानाखानी मारली


एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये शर्मिला यांची कार एसआयटीच्या कार्यालयाजवळ येताच पोलीस कर्मचारी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कार थांबल्यानंतर शर्मिला बाहेर जात पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत असल्याचं आणि कानाखाली मारत असल्याचं दिसत आहे. इतर पोलीस कर्मचारी शर्मिला यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करताना स्पष्ट दिसत आहे. या घटनेच्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की शर्मिला यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसाच्या त्यांनी कानाखाली मारली.






शर्मिला यांना पोलीस अधिकाऱ्याशी वाद झाला, त्यानंतर शर्मिलांना त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचा हात धरला, यामुळे संतापलेल्या शर्मिला यांनी पोलिसाला धक्काबुक्की करत कानाखाली मारली. यानंतर शर्मिला यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी 14 दिवसांसाठी जेलमध्ये करण्यात आली.






शर्मिला यांच्या आईकडून पोलिसांना धक्काबुक्की


शर्मिला यांच्यानंतर त्यांच्या आई वायएस विजयम्माही पोलीस ठाण्यात हजर झाल्या आणि त्यांनी देखील पोलिसांसोबत धक्काबुक्की केली. जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये शर्मिला यांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनीही पोलिसांसोबत बाचाबाची करत धक्काबुक्की केली.






पेपरफुटी प्रकरणी ठिकठिकाणी निदर्शने, आतापर्यंत 11 जण अटकेत


तेलंगणात सध्या ठिकठिकाणी भरती परीक्षेतील कथित पेपर फुटीप्रकरणी तेलंगणात तीव्र निदर्शने केली जात आहेत. पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर आतापर्यंत सुमारे 11 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 भरती परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, या कथित पेपफुटी प्रकरणासाठी विरोधी पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला आहे.