Telangana News: महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी जोर लावलेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना राज्यातच मोठा झटका बसलाय. तेलंगणातील BRS चे जवळपास दीड डझन नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. BRS चे माजी खासदार पी.एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.


खम्ममचे पीएस रेड्ड, माजी मंत्री कृष्णा राव, आमदार दामोदर रेड्डी आणि तीन-चार माजी आमदारांसह सुमारे दीड डझन नेते दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात या नेत्यांचे स्वागत करतील. कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला  खिंडार पाडले आहे. 


बीआरएसच्या बंडखोर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदर चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. अविभाजित खम्मम आणि महबूबनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. या बैठकीत बीआरएस आणि भाजपमधील आणखी नेते सहभागी होणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी एप्रिलमध्ये भारत राष्ट्र समिती (BRS) मधून निलंबित करण्यात आले होते. बीआरएसमध्ये सामील होण्यासाठी कृष्ण राव यांनी 2011 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. ते महबूबनगर जिल्ह्यातील कोल्लापूर मतदारसंघातून 2014 मध्ये BRSच्या तिकिटावर निवडून आले होते. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये  सहभागी होणार आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची  माहिती सूत्रांकडून मिळत. तसं असेल तर बीआरएसची तेलंगणातील मोठी हानी मानली जाईल.


BRS ची महाराष्ट्रामध्ये  मोर्चे बांधणी


तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव हे आक्रमक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोर्चे बांधणी करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड आणि त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर बीआरएस पक्षाची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्त बीआरएस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हजर राहणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्यासमोर एकाच वेळेस बीआरएस पक्षाचं प्रमोशन होईल या उद्देशानेच हे सर्व केलं जात आहे.


हे ही वाचा :


Ashadhi Wari 2023 : विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ येणार; असा असेल संपूर्ण दौरा