India Weather Update : देशात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काही ठिकाणी भूस्खलनाच्या (Landslide) घटना समोर आल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमल्यात (Shimala) ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसानंतर मुंबई(Mumbai), दिल्ली (Delhi) सारख्या मोठ्या शहरांमध्येही पाणी साचलं आहे.


अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस


सलग दोन दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे देशात काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन झालंय तर काही ठिकाणी पाणी साचलं आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून या भागात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


मुंबईत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू


मुंबईत शनिवारीच मान्सूनने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या (IMD) अधिकारी सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. 25 जूनपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. यादरम्यान दोन इमारतीही कोसळल्या, त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.


मैदानी भागात जोरदार पाऊस


राजधानी दिल्लीत अनेक भागात रविवारी सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात पावसानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, गुरुग्राम, कुरुक्षेत्र आणि मोहालीच्या अनेक भागात पाऊस झाला. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही पाऊस पडला.


कुठे ढगफुटी, तर कुठे भूस्खलन 


हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ढगफुटी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. हिमालचमधील सोलन आमि हमीरपूरमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यामे पूरसृश्य परिस्थिती निर्माण झाली. शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये जोरदाप पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण भूस्खलन झालं आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. 


उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस


हरिद्वारमध्येही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. कोणतीही जीवितहानी समोर आलेली नाही. शहरातील अनेक भागांतून पाणी तुंबण्याची समस्या समोर आली आहे. काही लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. उत्तराखंडच्या डेहराडून आणि ऋषिकेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.


हिमाचल प्रदेशात ढगफुटी


हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे. शिमल्याच्या रामपूर तालुक्यातील सरपारा गावात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे मोहल खड्‍यात अचानक पूर आला आणि अनेक वाहनांचं नुकसान झालं. जेसीबीच्या साहाय्याने नुकसान झालेली वाहने बाहेर काढण्यात आली आहेत.