अहमदाबाद : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे. गांधीनगर, मेहसाना, साबरकांठा, पाटण आणि अहमदाबादमध्ये यूपी, बिहारच्या लोकांवर हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत 170 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी दिली.


गुजरातमध्ये बाहेरच्या राज्यातील, विशेषतः यूपी आणि बिहारच्या लोकांविषयी भडकाऊ मेसेज वायरल केले जात आहेत. त्यामुळे वातावरण जास्त बिघडलं आहे. पण पोलीस हे हल्ले खपवून घेणार नाहीत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.

बाहेरच्या राज्यातील कामगारांना गुजरातमध्ये काम देऊ नये, अशी मागणी गुजरातमधील ठाकोर सेनेने केली आहे. या हल्ल्यांनंतर भाजपने काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांच्यावर निशाणा साधला आहे. पण आपण ठाकोर सेनेला हल्ला करण्यास कधीही सांगितलं नाही, असं अल्पेश ठाकोर यांनी म्हटलं आहे.

हल्ल्यांवरुन राजकारण

बिहारींवर होणाऱ्या हल्ल्यांना काँग्रेस समर्थित संघटना जबाबदार असल्याचा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. सुशील मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशीही फोनवरुन बातचीत केली. अल्पेश ठाकोर यांच्याशी संबंधित संघटना ठाकोर सेनेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याचं सुशील मोदी यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. परराज्यातील लोकांवर हल्ल्याप्रकरणी गुजरातमध्ये विविध जिल्ह्यात आतापर्यंत 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुजरातमधील कंपन्यात बाहेरच्या राज्यातील कामगारांना मोठ्या प्रमाणात नोकरी देण्यात आली आहे, असा मेसेज सोशल मीडियावर वायरल करण्यात आला. यानंतर सकाळी सकाळी अरवल्ली जिल्ह्यातील काबोला गावातील एका कारखान्यासमोर जवळपास 200 लोकांच्या टोळक्याने गर्दी केली. पण पोलिसांनी या लोकांना पळवून लावलं आणि यापैकी 13 जणांना अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली.