Farmers protest update : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा एकीकडे निकाली निघत नसतानाच दर दिवसाआड केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी पेटताना दिसत आहे. येत्या 26 जानेवारीला एकीकडे राजपथावर परेडची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी गेले दोन महिने आंदोलन करत आहेत. तेच शेतकरी आता ट्रॅक्टर परेडची तयारी करत आहेत. या परेडसाठी त्यांना ठराविक मार्ग करून देण्यात आलेले आहेत.
अशी असणार ट्रॅक्टर परेड
यामध्ये सिंधू बॉर्डर वरून 74 किलोमीटर परेड असणार आहे. तर टिकरी बॉर्डर 83 किलोमीटर, गाजीपूर 68 किलोमीटर, चिला बॉर्डरवरून 10 किलोमीटर या सगळ्या मार्गांवर अशी रॅली होऊन पुन्हा एकदा ज्या ठिकाणी हे सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत त्याच ठिकाणी येणार आहेत. अनेक ठिकाणी मैदानांवर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर जमायला सुरुवात देखील झाले आहे .मात्र यामुळे 26 जानेवारीला दिल्लीतील सीमा मात्र जॅम होणार आहेत.
दिल्लीच्या सीमेवर सध्या प्रचंड थंडी
दिल्लीच्या सीमेवर सध्या प्रचंड थंडी पडतेय. परंतु इतक्या थंडीतही शेतकऱ्यांचा उत्साह जरा देखील कमी झाला नाही. त्यांच्या भूमिकेवर ते अद्यापही ठाम आहेत. जोपर्यंत सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळेच कडाक्याच्या थंडीतही 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीची जोरदार तयारी सुरू आहे. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये काही घोडे देखील असणार आहे. या घोड्याना थंडी वाजू नये यासाठी खास कपडे तयार (Jacket) करण्यात आले आहेत. जागोजागी शेकोटीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांसह लहान मुलं, महिला,वृद्ध नागरिक या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या सगळ्यांना या थंडीत चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या थंडीपासून शेतकऱ्यांच्या बैलांचं, लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी काही तरुण मंडळी पुढे आली आहे आणि त्यांनी टेंट सिटी सिंधू बॉर्डरवर तयार केली आहे.ज्यामध्ये दोनशेहून अधिक टेंट लावण्यात आले आहेत आणि लोकांना ब्लँकेट गादी या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली जात आहे.