Telangana Assembly Election Results 2023 : तेलंगणात (Telangana Assembly Election Results) हॅट्ट्रिक आणि देशव्यापी नेतृत्वाची स्वप्न पाहत असतानाच भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्याकडून काँग्रेसने एकहाती सत्ता खेचून आणली आहे. तेलंगणामधील 119 जागांपैकी 68 जागांवर निर्णायक आघाडी घेत सरकार स्थापनेच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. केसीआर यांना थेट भिडलेल्या रेवंत रेड्डी यांचा करिश्मा (K. Chandrashekar Rao vs Revanth Reddy) काँग्रेससाठी तेलंगणात निर्णायक ठरला. त्यामुळे कर्नाटकनंतर तेलंगणा काबीज करण्यात काँग्रेसला यश आलं आहे. आज (3 डिसेंबर) सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या अपडेटनुसार राज्यातील विधानसभेच्या एकूण 119 जागांपैकी काँग्रेस 68 जागांवर आघाडीवर आहे. पक्षाने आतापर्यंत 10 जागा जिंकल्या आहेत, तर 53 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (BRS) 7 जागा जिंकल्या असून 36 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने आतापर्यंत 1 जागा जिंकली आहे, तर 8 वर आघाडीवर आहे. AIMIM 6 जागांवर आघाडीवर आहे. एका जागेवर सीपीआयचे उमेदवार आघाडीवर आहे. 


मुख्यमंत्री केसीआर पराभूत


मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. त्यांचा भाजपच्या केव्ही रमणा यांनी पराभव केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा रेवंत रेड्डीही याच जागेवरून निवडणूक लढवत होते. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. केसीआर गजवेलशिवाय ते कामरेड्डीमधून निवडणूक लढवत होते. गजवेल या त्यांच्या पारंपरिक जागेवरून त्यांनी निवडणूक जिंकली. रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक रिंगणात होते. त्यांनी कोडंगलमधून त्यांची दुसरी जागा जिंकली. भाजपने रिंगणात उतरवलेल्या तीन विद्यमान खासदारांमध्ये, माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार करीमनगर विधानसभा मतदारसंघातून, निजामाबादचे खासदार धर्मपुरी अरविंद कोरटलातून आणि आदिलाबादचे खासदार सोयम बापूराव या दोघांमधून पिछाडीवर आहेत. गोशामहलमधून भाजपचे टी. राजा सिंह आघाडीवर आहेत.


बड्या चेहऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्यमंत्री केटीआर हे सिरिल्ला मतदारसंघातून आघाडीवर आहेत. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. ज्युबली हिल्समधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन पिछाडीवर आहेत.


रेवंत रेड्डी मुख्यमंत्री निश्चित


तेलंगणातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या घरी जल्लोष सुरू आहे. ट्रेंड स्पष्ट झाल्यानंतर तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार आणि सीआयडीचे अतिरिक्त डीजीपी त्यांना भेटण्यासाठी रेड्डी यांच्या घरी पोहोचले. रेड्डी अद्याप कोणतेही पद भूषवत नसले तरी सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. रेड्डी मुख्यमंत्री होतील असे मानले जात आहे.


तेलंगणात 9 वर्षे बीआरएस सरकार


जून 2014 मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन तेलंगणा हे नवीन राज्य म्हणून स्थापन करण्यात आले. या वर्षी राज्यात पहिली विधानसभा निवडणूक झाली. यामध्ये तेलंगणा वेगळे राज्य बनवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या टीआरएस (तेलंगणा राज्य समिती, जी आता भारत राष्ट्र समिती बीआरएस झाली आहे) या पक्षाला बहुमत मिळाले. 2018 मध्ये दुसऱ्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत केसीआर अधिक मजबूत झाले. यावेळी त्यांच्या पक्षाला 88 जागा मिळाल्या. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 25 जागा जास्त. दोन जागा गमावून काँग्रेसने 19 जागा जिंकल्या, AIMIM 7 आणि भाजपने एक जागा जिंकली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या