ऑक्सफोर्ड, ब्रिटन : ऑक्सफर्ड विद्यापीठातील (Oxford University) एका कार्यक्रमात भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या कलवकुंतला कविता यांनी हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीत 'तेलंगणा विकास मॉडेल' महत्त्वाचा मुद्दा असेल, असं कविता यांनी सांगितलं. तेलंगणाच्या सर्वसमावेशक विकासाच्या मॉडेलने समृद्धी आणली आहे आणि राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत हाच पक्षाचा मुख्य मुद्दा असेल आणि पक्ष यापुढे सर्वसमावेशक विकास करेल. तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानात
जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात 'सर्चिंग फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ : द तेलंगणा मॉडेल' या व्याख्यानासाठी भारत राष्ट्र समिती (BRS) विधानपरिषदेला आमंत्रित करण्यात आलं होतं. यानिमित्ताने BRS नेत्या कलवकुंतला कविता यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठात सोमवारी संध्याकाळी व्याख्यान दिलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानात कविता कालवकुंतला यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या दूरदर्शी 'सर्वसमावेशक विकास : तेलंगणा मॉडेलचा शोध' या नमुन्याबाबत मार्गदर्शन केलं.
'तेलंगणा विकास मॉडेल'ची किर्ती सर्वदूर
तेलंगणा मॉडेल हे संतुलित विकासाचे प्रतीक आहे, कल्याणकारी वाढीसह पायाभूत सुविधांच्या प्रगतीला बारकाईने जोडलेले आहे, असं त्यांनी म्हटलं. 'मला विश्वास आहे की, आपल्या मातृभूमीच्या भारताच्या, आपल्या भारत मातेच्या अपरिहार्य उदयात, केसीआर (KCR) सारख्या सच्च्या राज्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली, जे तेलंगणाचे शिल्पकार आहेत, आपण आपल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात समृद्ध भविष्य घडवू." असं कविता यांनी म्हटलं आहे.
तेलंगणा मॉडेल कसं आहे?
'तेलंगणा मॉडेल' हे एक समृद्ध मॉडेल आहे, ज्यामुळे तेलंगणातील लोकांचे जीवन उच्च स्तरावर नेण्यास मदत झाली आहे, असं कविता यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, तेलंगणा राज्यात तळागाळातील सर्व क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक विकास झाला आहे. हा आमचा मुख्य मुद्दा आहे, ज्यासह आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत. तेलंगणातील जनतेने गेल्या दोन टर्ममध्ये पक्षाला त्यांचे "आशीर्वाद" दिले आहेत आणि या काळात पक्ष त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कलवकुंतला कविता यांनी यांनी तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर संकट आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा केली. मूलभूत तत्त्वे नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे, मुक्त उद्योगाची संस्कृती वाढवणे आणि संपत्तीचे समान वितरण सुनिश्चित करणे, आर्थिक व्यावहारिकता आणि प्रशासन यांचा संगम तेलंगणा मॉडेलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कृषी पुनरुज्जीवनाकडे तेलंगणाचा दृष्टीकोन, TS-iPass सारख्या उपक्रमांद्वारे औद्योगिक सुविधा आणि नाविन्यपूर्णतेवर भरीव फोकस हे राज्याच्या वाढत्या आर्थिक आणि त्यासोबत सामाजिक विकासाला कारणीभूत ठरल्याचं कविता यांनी सांगितलं तेलंगणाच्या कृषी पुनर्जागरणाची कथा, भात उत्पादनात लक्षणीय वाढ आणि शेतकर्यांसाठी आधारभूत फ्रेमवर्क विशेषतः अधोरेखित केलं गेलं.