मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तेलंगणातील सिंगरेनी कोळसा खाणीत (SCCL) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसने (Congress) खासदार राहुल गांधी आणि कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी बसून कर्मचाऱ्यांशी गप्पा मारताना आणि फोटो काढताना दिसत आहेत.


निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, , "आज मी सिंगरेनी कोळसा खाणीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सिंगरेनी कोळसा खाण आम्ही खासगी हातात जाऊ देणार नाही. काँग्रेस पक्ष येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करेल."






राहुल गांधींचा भाजपवर निशाणा 


तेलंगणामध्ये निवडणूक प्रचाराच्या रोड शोदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. 'नरेंद्र मोदी येतील आणि तुम्हाला सांगतील की मी प्रत्येक बँक खात्यात 15 लाख रुपये टाकेन. मी नोटाबंदीच्या माध्यमातून काळ्या पैशाविरुद्ध लढा देईन. ते येऊन सांगतील की जीएसटीचा गरिबांना फायदा होईल. दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले की, "मी प्रत्येक गरीबाला 3 एकर जमीन देईन. हे लोक एकामागून एक खोटे बोलतात, पण मी तुमच्याशी खोटं बोलायला आलो नाही', असं राहुल गांधी म्हणाले. 


राजा आणि प्रजेची लढाई - राहुल गांधी


काँग्रेसचा सध्या तेलंगणामध्ये दौरा सुरु आहे. या दौऱ्यात खासदार राहुल गांधी यांनी भूपालपल्ली ते पेड्डापल्ली या मार्गावर सभेला संबोधित केले. येथे त्यांनी बीआरएस आणि राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'बीआरएस तेलंगणा विधानसभा निवडणुकीत हरणार आहे. ही राजा आणि जनता यांच्यातील लढाई आहे. 10 वर्षांनंतरही तेलंगणाचे मुख्यमंत्री जनतेपासून अंतर राखत आहेत.'



काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही केसीआर यांच्यावर यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले आहेत. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, तेलंगणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. राज्यात केवळ एकाच कुटुंबाचे संपूर्ण नियंत्रण आहे. राज्यात केवळ एकाच कुटुंबाचे संपूर्ण नियंत्रण आहे. तेलंगणात तुमच्या खिशातून एक लाख कोटी रुपये चोरीला गेले आहेत. याचा फायदा येथील शेतकरी आणि मजुरांनाच झाला नाही तर कंत्राटदार आणि त्यांच्या कुटुंबियांनाही झाला आहे.


हेही वाचा : 


PM Modi : 'तरुणांच्या जीवनात नवी पहाट होणार', ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन