हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांसाठी हमाल बनणार आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्तेही निधी मिळवण्यासाठी हमाल म्हणून काम करणार आहेत.
चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वच नेते शारीरिक श्रमांमधून निधी गोळा करणार आहेत. पुढील शुक्रवारी राज्यातील विविध भागांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची संमेलने होणार आहेत.
पक्षाच्या कार्यक्रमासाठी निधी श्रमदानातून
या संमेलनांनंतर तेलंगणाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वारांगलमध्ये पक्षाची मोठी जनसभा होणार आहे. पक्षाच्या संमेलनासाठी निधी गोळा करण्यासाठी तेलंगणा राष्ट्रीय समितीचे नेते शारीरिक कष्टाची कामे करणार आहेत.
अंग मेहनतीची कामं करुन संमेलनाला जाण्याचा, प्रवासाचे पैसे मिळवण्याचा तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ‘गुलाबी कुली दिनालू’ असं नाव दिलं आहे.
अंग मेहनतीतून पैसे कमावणार असल्याचं राव यांनी सांगितले. आपण कृतीतून पक्षाचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांसमोर एक उदाहरण ठेवू, असे राव यांनी म्हटलं आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवणं, हे नव्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असेल, असंही मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांची संख्या 75 लाख इतकी आहे. 2014 मध्ये पक्ष सत्तेत आला, त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या 52 लाख इतकी होती, अशी माहिती चंद्रशेखर राव यांनी दिली.
‘आम्ही सभासदत्व शुल्कातून 35 कोटींची रक्कम उभारली. ही संपूर्ण रक्कम पक्षाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे,’ अशी माहितीही चंद्रशेखर राव यांनी दिली.