हैदराबाद: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशातील सार्वजनिक संपत्तीचे खासगीकरण करत आहे, त्याचं आम्ही पुन्हा राष्ट्रीयीकरण करु असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटलंय. भाजपकडून देशातील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या खम्म या ठिकाणी झालेल्या परिषदेसाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी केसीआर आणि इतर नेत्यांनी आपल्या भाषणामधून भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 


केसीआर म्हणाले की, "तुम्ही एलआयसीचं खाजगीकरण केल्यास आम्ही त्याचे राष्ट्रीयीकरण करू. पॉवर डिस्कॉम्सचं आम्ही खासगीकरण करु देणार नाही. विशाखा स्टीलची कोणत्याही परिस्थितीत विक्री केली जाणार नाही. त्याचे पुन्हा राष्ट्रीयीकरण करू. आज भारतीय समाजाचे ध्येय काय आहे? भारताचा मार्ग चुकला आहे का? या देशात काय चालले आहे? हा प्रश्न मला अनेक दिवस सतावत आहे. ही या देशातील जनतेची संपत्ती आहे, ज्याला कोणाकडून भीक मागण्याची गरज नाही, जागतिक बँक, अमेरिका किंवा इतर कोणत्याही परदेशी मदतीची गरज नाही. आमच्याकडे लाखो कोटींची संपत्ती आहे, आम्ही कशाला दुसऱ्यांकडे भीक मागतो. आम्ही कोणत्याही विकसित देशापेक्षा कमी नाही, पण आमची फसवणूक होत आहे. बीआरएसच्या उदयाचे हे मुख्य कारण आहे."


केंद्राचा मेक इन इंडिया उपक्रम अयशस्वी ठरला आहे. 'रयथू बंधू' सारख्या कल्याणकारी योजना देशभर राबवल्या पाहिजेत असंही के चंद्रशेखर राव म्हणाले. 


केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "आज आम्ही एक नवीन प्रतिकार सुरू करत आहोत. केंद्रातील सत्ताधारी भाजपला लोकशाहीचा पायाच उद्ध्वस्त करायचा आहे.आपल्या सर्व मातृभाषांना मागे टाकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या मातृभाषा नष्ट करून हिंदी लादल्यास राष्ट्राच्या अखंडतेवर परिणाम होईल."


यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी खम्मम येथील जाहीर सभेत भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, " केंद्र सरकारचे अजून 400 दिवस बाकी आहेत. आम्हाला वाटायचे हे सरकार आहे जे हटणार नाही असा दावा करत होते.पण आता केंद्र सरकार आपले दिवस मोजू लागले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकार सत्तेत असणार नाही. 


मोदींना फक्त विरोधकांची सरकार पाडण्याची काळजी; अरविंद केजरीवालांची टीका


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "स्टॅलिन आमची शाळा पाहण्यासाठी आले होते, त्यांनी परत जाऊन त्यांची शाळांच्या विकासाची दिशा निश्चित केली. शाळेच्या उद्घाटनासाठी मला आमंत्रित केले. देशात पहिल्यांदाच नेते एकत्र येत आहेत. अखिलेशसारखे नेते आमच्यासोबत येत आहेत. मी दहावीत असताना ऐकायचो केरळमध्ये शाळा चांगल्या आहेत, मग संपूर्ण देशात अजून चांगल्या शाळा का नाहीत? सर्व राज्यपाल मुख्यमंत्र्यांना त्रास देत आहेत, हे राज्यपाल मोदींना त्रास देत नाहीत. पंतप्रधान मोदींना बेरोजगारी किंवा वस्तूंच्या वाढत्या किमतीची पर्वा नाही. त्यांना फक्त राज्यांतील बिगर-भाजप सरकार पाडण्याची काळजी आहे."