नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात गोंधळ झालाय. श्याम मानव फक्त हिंदू धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करत आहेत. आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांनी कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला असा आरोप करत काही तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रमात गोंधळ घातला. श्याम मानव यांची सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहून घोषणाबाजी केली.
धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करण्यासाठी आज नागपुरात अंनिसतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या सभेतून कोणतीच पोलखोल न करता त्यांनी फक्त हिंदू धर्माची बदनामी केली असा आरोप करत काहींनी कार्यक्रमस्थी गोंधळ घातलाय.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांची आज नागपुरात जाहीर सभा झाली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही सभा आयोजित केली होती. यावेळी श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपुरात धीरेंद्र कृष्ण महाराज यांची राम कथा आणि दिव्य दरबार झाले होते. या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज अंधश्रद्धा पसरवतात असा अंनिसने आरोप केला होता. धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात असतानाच अंनिसने त्यांना दिव्य शक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. मात्र धीरेंद्र कृष्ण महाराज अंनिसचे आव्हान न स्वीकारताच आपली राम कथा संपवून नागपुरातून परत गेले होते.
धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी भविष्य सांगण्याठी प्रत्येकी एक हजार रूपये घेतले जात असून याबाबतचे पुरावे आहेत. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी अनिसने केली आहे. नागपुरात झालेल्या धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या दिव्य दरबारात प्रश्न विचारून महाराजांकडून त्याबद्दल उत्तर मिळवण्यासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी 1 हजार रुपये प्रत्येक व्यक्तीकडून घेतले जात असल्याचा आरोप अंनिसकडून करण्यात आलाय. 1 हजार रूपये देण्यासाठी लोकांना बँक अकाऊंट देखील देण्यात आले होते असा आरोप अंनिसने केलाय. त्यामुळे हे कृत्य जादू टोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन असल्याने धीरेंद्र कृष्ण महाराज विरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी पुरेसे आहे. याच पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अंनिसने केली आहे.
नागपूरमधील दिव्य दरबाराच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज काही भाविकांच्या घरी कुठे काय ठेवले आहे हे दिव्य शक्तीद्वारे सांगायचे. या द्वारे ते दिव्य शक्तीच्या माध्यमातून भाविकांच्या घरी पाहू शकतात असा दावा करायचे. परंतु, असा दावा करणे हे जादू टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. याचे सर्व पुरावे नागपूर पोलिसांना देण्यात आले आहेत तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप अंनिसने केलाय.
"धिरेंद्र कृष्ण महाराज यांच्या विरोधात पुरावे देऊन देखील नागपूर पोलिस महाराजांविरोधात कारवाई करत नाहीत. पोलिस गुन्हा दाखल करत नसतील तर ते ही अप्रत्यक्षरित्या जादूटोना, अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याने आरोपी बनतात. जादू टोना विरोधी कायद्याचं उल्लंघन होत असताना पोलिस गुन्हा दाखल करत नसतील, शिवाय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री असताना असे घडत असेल तर लोकांना काय संदेश जाईल असा प्रश्न आजच्या सभेतून श्याम मानव यांनी उपस्थित केलाय.
धिरेंद्र कृष्ण महाराज यांचे भक्त हिंदू आहेत. त्यामुळे हिंदुंना लुबाडणाऱ्या बाबाविरोधात गुन्हा दाखल न होऊ देणे म्हणजे देवेंद्र फडणवीस देखील हिंदुंना लुबाडणाऱ्या बाबाच्या पाठीशी आहात, तुमची अशी प्रतिमा तयार होणे योग्य नाही, तुम्हाला ही ते आवडणार नाही, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ