नवी दिल्ली: चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा आपात्कालीन दरवाजा (Emergency Exit) उघडल्याप्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) यांनी माफी मागितल्याचं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी स्पष्ट केलं आहे. तेजस्वी सूर्या यांनी विमानाचा आपात्कालीन दरवाजा उघडला होता, पण चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यात, 10 डिसेंबर 2022 रोजी चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमान 6E-7339च्या प्रवासावेळी ही घटना घडली होती.  


केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, "विमान हवेत उड्डाण घेण्यापूर्वी ही घटना घडली होती. खासदार तेजस्वी सूर्या यांनी चुकून इमर्जन्सी गेट उघडलं. त्यानंतर त्यांनी स्वत: या घटनेची माहिती विमानातील कर्मचाऱ्यांना दिली आणि माफीही मागितली. या घटनेनंतर विमानाच्या सुरक्षेची संपूर्ण खात्री केल्यानंतरच या विमानानं उड्डाण घेतलं."


Tejasvi Surya: काय आहे प्रकरण? 


काही दिवसांपूर्वी DGCA ने आपल्या एका निवेदनात म्हटलं होतं की 10 डिसेंबर रोजीच्या इंडिगो विमान 6E-7339 मध्ये एका प्रवाशांने इमर्जन्सी गेट उघडलं होतं. या प्रकरणाचा आदेश देण्यात आला आहे. DGCAच्या या निवेदनानंतर इमर्जन्सी गेट उघडणारा तो प्रवासी म्हणजे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या असल्याचं स्पष्ट झालं. तेजस्वी सूर्या यांचे नाव या प्रकरणात उघड झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्ष काँग्रेस, एमआयएम आणि टीएमसी यांनी टीका केली होती. 


या प्रकरणी माध्यमांनी तेजस्वी सूर्या यांची प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता, तसेच हे प्रकरण नाकारलंही नव्हतं. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच तो प्रवासी म्हणजे खासदार तेजस्वी सूर्या असल्याचं स्पष्ट केलंय. 


कर्नाटक काँग्रेसची कडाडून टीका 


खासदार तेजस्वी सूर्या यांनी विमानाचे उड्डाण होण्यापूर्वीच इमर्जन्सी गेट उघडलं. त्यानंतर या प्रकरणाची नोंद घेत विमान प्रशासनाने विमानाच्या सुरक्षेची खात्री केली. विमानाचं प्रेशर तपासलं आणि त्यानंतरच विमानाचं उड्डाण झालं. पण यामुळे विमानाच्या उड्डाणासाठी 30 मिनिटं उशीर लागला. 


विमानाचे इमर्जन्सी एक्झिट गेट उघडण्याचा प्रयत्न करून तेजस्वी सूर्या यांनी लहान मुलांसारखे कृत्य केल्याची टीका कर्नाटक काँग्रेसने केली. इमर्जन्सी एक्झिट गेट उघडण्यामागे तेजस्वी सूर्यांचा हेतू काय होता? त्यामागे कोणती योजना होती? माफी मागितल्यानंतर त्यांची पाठीमागच्या सीटवर का बदली करण्यात आली? असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहे. यानंतर काही आपत्ती घडली असती तर कोण जबाबदार होतं असंही म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा: