पाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. कारण तेजस्वी यादव यांना एक-दोन नव्हे तर 44 हजारांहून अधिक लग्नाच्या ऑफर आल्या आहेत. या ऑफर सरकारी व्हॉट्सअप नंबरवर आल्या आहेत.


नंबर दिला तक्रारीसाठी, मेसेज आले लग्नासाठी

खरंतर बिहार सरकारने रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्हॉट्सअप नंबर जारी केला होता. मात्र या नंबरवर रस्त्याच्या तक्रारी कमी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी लग्नाच्या ऑफरच जास्त आल्या.

व्हॉट्सअपवर तरुणींनीच जास्त मेसेजे केले आहेत. तरुणींनी आपलं वय, रंग, उंची इतकंच नाही तर फिगरची माहिती देत, लग्नासाठी ऑफर दिली आहे. असे एक-दोन मेसेज नाही तर 44 हजारांहून अधिक मेसेज आले आहेत.

लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप हे नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. दोघेही अविवाहित आहेत. बिहारमध्ये या दोघांच्या लग्नाची सातत्याने चर्चा होत असते.

मात्र आता सरकारी व्हॉट्सअप नंबरवरच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना लग्नासाठी हजारो ऑफर आल्या आहेत. या ऑफरद्वारे आपली फिगर, राजकीय महत्त्वकांक्षा, बायोडेटा पाठवला आहे. तर काहींनी आपल्याशी लग्न केल्यावर काय राजकीय फायदा मिळेल, हे सुद्धा पटवण्याचा प्रयत्न केला आहे.