मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस लवकरच रुळांवर अवतरणार आहे. ही हायटेक ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. तेजस ट्रेन 22 मेपासून मुंबईच्या सीएसटीहून गोव्याच्या करमाळी स्टेशन असा प्रवास करणार आहे.


रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर या ट्रेनची पाहणी केली. सीएसटी स्टेशनवरुन सोमवारी सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

तेजस एक्सप्रेसचा पहिला रॅक कपूरथलाच्या रेल्वे कारखान्यात बनवला आहे. तेजस ट्रेनच्या डब्ब्याचं डिझाईन सुरेश प्रभूंना आवडलं. ते म्हणाले की, "तेजस एक्स्प्रेस सर्वात आधी मुंबई आणि गोव्यात धावेल. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनौ आणि दिल्ली-चंदीगडमध्ये चालवण्यात येईल."



200 किमी प्रतितास वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली ट्रेन असेल. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठई रेल्वेला 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करावे लागले आहे. याचे दरवाजे स्वयंचलित असतील.  शिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही असतील.

ही ट्रेन आठवड्याच्या पाच दिवस धावणार आहे. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत. तेजस एक्स्प्रेस अवघ्या 8.30 तासात गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचेल. तर पावळ्यात कोकणातील परिस्थिती पाहता ट्रेनला करमाळीला पोहोचण्यासाठी 10.30 तास लागतील.

तेजस ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे सोईसुविधा पुरवण्यात आलेल्या असून अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचं स्वप्न तेजसच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. संपूर्ण ट्रेनवर खास प्रकारचं पॅटर्न छापण्यात आला आहे. तेजस ट्रेनचं भाडं शताब्दी ट्रेनच्या तुलनेत जास्त असेल.

'तेजस'चा सुपरफास्ट प्रवास




पावसाळी वेळापत्रक

सोमवार, बुधवार, शनिवार
सीएसटी - पहाटे 5.00 वाजता
करमाळी - दुपारी 3.40 वाजता

परतीचा प्रवास
मंगळवार, गुरुवार, रविवार
करमाळी - दुपारी 2.30 वाजता
सीएसटी - रात्री 11 वाजता

पावसाळा वगळता
बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
सीएसटी - पहाटे 5 वाजता
करमाळी - दुपारी 1.30 वाजता

परतीचा प्रवास
करमाळी - दुपारी 2.30 वाजता
सीएसटी - रात्री 11 वाजता

तेजसचे थांबे
सीएसटी, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी