मुंबई : भारताच्या पाचशेव्या कसोटीच्या निमित्तानं बीसीसीआयनं आजवरच्या सर्व कसोटीवीरांची मिळून ड्रीम टीम जाहीर केली आहे. यामध्ये सचिन, धोनी, युवराज, सेहवाग, सुनिल गावस्कर यांची वर्णी लागली आहे. क्रिकेट चाहत्यांनी एका ऑनलाईन पोलद्वारा या टीमची निवड केली आहे.
या ड्रीम टीममध्ये महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून समावेश झाला आहे. धोनीशिवाय सुनील गावस्कर, वीरेन्द्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, कपिल देव, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि झहीर खानचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे युवराज सिंगचा या ड्रीम टीममध्ये बारावा खेळाडू म्हणून समावेश झाला आहे. युवीनं 40 कसोटींमध्ये केवळ 1900 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे या संघात भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश नाही. गांगुलीनं 113 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना 7,212 धावा केल्या होत्या आणि 32 विकेट्सही काढल्या होत्या. पण त्याला चाहत्यांनी या संघात स्थान दिलेलं नाही.