कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात ब्रिज कोसळून एकाला प्राण गमवावे लागले. दक्षिण कोलकात्यातील ताराताला भागात असलेला माजेरहाट ब्रिज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पडला. ढिगाऱ्याखाली काही गाड्या अडकल्यामुळे अनेक जण दबले गेल्याची भीती वर्तवली जात आहे.
दुर्घटनेच्या वेळी पुलावरुन अनेक वाहनं जात होती. ही वाहनं पुलाखाली गेल्यामुळे काही जण चिरडले गेल्याची भीती वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत काही गाड्यांचाही चक्काचूर झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखालून पाच ते सहा जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रेल्वेमार्गावरुन जाणारा माजेरहाट ब्रिज बेहाला आणि इकबालपूर या भागांना जोडत होता. सुदैवाने पुलाखालून ट्रेन जात नसल्यामुळे मोठी हानी टळली. माजेरहाट ब्रिज 60 वर्ष जुना असून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं.