नवी दिल्ली : टीडीपी खासदार जयदेव गल्ला यांनी आज लोकसभेत मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या चर्चेला सुरुवात केली. आंध्र प्रदेशकडे मोदी सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जयदेव गल्ला म्हणाले, आंध्र प्रदेशच्या विकासासाठी केंद्र सरकारने जेवढा निधी दिला, त्यापेक्षा जास्त तर ‘बाहुबली’ सिनेमाचं कलेक्शन होतं.

मोदी-शाह जोडीने राज्यांना फक्त पोकळ आश्वासनं दिली, असे म्हणत जयदेव गल्ला यांनी तेलुगु फिल्म ‘भरत अनी नेनू’ सिनेमाचा दाखला दिला. या सिनेमात ज्या प्रकारे वडिलांच्या मृत्यूनंतर एनआरआय मुलगा सत्ता सांभाळतो आणि राज्यातील जनतेला सांगता की आश्वासनं ही आश्वासनंच असतात. या सिनेमाच्या कथेसारखे मोदी सराकर राज्यांसोबत वागत आहेत.

राज्य विभाजनावेळी केंद्र सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, त्यामुळे आंध्र प्रदेशात मुलभूत सुविधाही पुरवणे शक्य होत नाही. पर्यायाने राज्य सरकारला मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे, असे जयदेव गल्ला म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही त्यांच्या आश्वासनपूर्तीची अजूनही वाट पाहत आहोत, असेही गल्ला म्हणाले.

“आंध्र प्रदेशची स्थिती बुंदेलखंडहून वाईट आहे. बुंदेलखंडचं दरडोई उत्पन्न 4 हजार रुपये आहे, तर आंध्र प्रदेशचं दरडोई उत्पन्न 400 रुपये आहे. केंद्र सरकार आंध्र प्रदेशबाबत भेदभाव करत असून, काँग्रेसची जशी स्थिती झाली, तशी भाजपची होईल. ही मोदी सरकारला धमकी नसून, शाप आहे.” असे म्हणत जयदेव गल्ला यांनी जोरदार निशणा साधला.

अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी टीडीपीला केवळ 13 मिनिटांचा अवधी नियोजित होता. मात्र  खासदार जयदेव गल्ला तब्बल 40 मिनिटं बोलले.

कोण आहेत जयदेव गल्ला?

आंध्र प्रदेशचे उद्योजक आणि राजकीय नेत्यांमधील एक नाव म्हणजे जयदेव गल्ला. परदेशात शिकलेल्या उद्योजक जयदेव गल्ला यांनी वयाच्या चाळिशीत राजकारणात प्रवेश केला. जयदेव हे अमर राजा ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रमुख आहेत. त्यांच्या अनिवासी वडिलांनी याची सुरुवात केली होती. जयदेव गल्ला तीन दशकांपूर्वी अमेरिकेतून भारतात परतले होते. या ग्रुपच्या मोठ्या उत्पादनांमध्ये अॅमरॉन बॅटरीचा समावेश आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जयदेव गल्ला यांनी 683 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी गुंटूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता.

महेश बाबू जयदेव गल्लांचा मेहुणा

जयदेव गल्ला हे चित्तूरमधील आहेत. तेलुगु चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांची मुलगी पद्मावतीसोबत त्यांचं लग्न झालं. सुपरस्टार महेश बाबू हा जयदेव गल्ला यांचा मेहुणा आहे.

चंद्राबाबू आणि जयदेव याचं चित्तूर कनेक्शन

चंद्राबाबू नायडूही चित्तूरमधीलच आहे. जयदेव यांचा जन्म झाला, तिथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर नायडू यांचं घर आहे. दोन्ही कुटुंबामधील संबंध अतिशय चांगले आहेत. जयदेव गल्ला यांचे आजोबा पी राजगोपाल नायडू हे चंद्राबाबूंचे मेंटॉर होते. परदेशात शिक्षण पूर्ण केलेल्या आंध्र प्रदेशातील सुरुवातीच्या लोकांमध्ये पी राजगोपाल नायडू यांचा समावेश आहे. पी राजगोपाल नायडूंनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं, मग ते राजकारणात आले. त्यांची मुलगी अरुणा अमेरिकेत शिकली आहे. ती भारतात आली आणि जयदेव यांच्या वडिलांशी लग्न केलं. त्या देखील राजकारणात आल्या आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार आणि मंत्रीही बनल्या. नुकताच त्यांनी तेलगु देसम पक्षात प्रवेश केला. जयदेव गल्ला यांनी आपल्या आईकडून राजकारणाचे धडे गिरवले आहेत.

अमरॉन बॅटरीची निर्मिती

जयदेव यांचे वडील रामचंद्र यांचं शिक्षणही अमेरिकेत झालं आहे. दोन दशक तिथेच काम केल्यानंतर ते चित्तूरला परतले. त्यांनी अमर राज ग्रुप ऑफ कंपनीजची सुरुवात केली. आता कंपनीचा टर्नओव्हर सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे. आपल्या वडिलांकडून बिझनेसमधील बारकावे शिकणाऱ्या जयदेव यांनी अॅमरॉन बॅटरीची सुरुवात केली, जो सध्या भारतात दुसरा सर्वात मोठा ब्रॅण्ड आहे. पूर्व आशियामध्येही ही बॅटरी अतिशय लोकप्रिय आहे.