नवी दिल्ली : "तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे, द्वेष आहे, तुमच्यासाठी मी पप्पू आहे, पण माझ्या मनात तुमच्याविषयी जरासाही राग नाही," असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. एवढ्यावरच राहुल गांधी थांबले नाहीत तर आपल्या जागेवरुन उठून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेले आणि त्यांची गळाभेट घेतली.


लोकसभेत आज मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा सुरु आहे. यावेळी राहुल गांधीनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत मोदींसह भाजप सरकारवर चौफेर टीका केली.

"भाजप आणि आरएसएसचा मी आभारी आहे, त्यांच्यामुळे मला काँग्रेसचा अर्थ कळला. त्यांनी मला हिंदुस्तानी काय असतं हे शिकवलं. हिंदू असल्याचा अर्थ समजावला. तुमच्या मनात माझ्यासाठी तिरस्कार आहे, तुमच्यासाठी मी पप्पू असेन. तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. त्याने मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही," असं म्हणत राहुल गांधी आपल्या जागेवरुन उठले आणि मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली.

यानंतर पंतप्रधान मोदींनी हसत राहुल गांधींशी हस्तांदोन केलं आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली. मग आपल्या जागेवर येत, ही आहे 'हिंदू संस्कृती' असं म्हणत राहुल गांधींनी भाषण संपवलं. पण भाषणानंतर घडलेल्या या प्रकाराने सभागृहातील सगळेच जण थक्क झाले.