चेन्नई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करणारे तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक व्ही. आर. लक्ष्मीनारायण यांचं वयाच्या 91 व्या वर्षी रविवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. व्हीआरएल नावाने प्रसिद्ध असलेले लक्ष्मीनारायण 1951 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. उद्या (25 जून) त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लक्ष्मीनारायण यांनी 1977 मध्ये भ्रष्टाचाराच्या एका आरोपाखाली इंदिरा गांधी यांना अटक केली होती. लक्ष्मीनारायण यांनी 1945 मध्ये मद्रास ख्रिश्चियन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या पोलीस कारकिर्दिची सुरुवात केली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना त्यांना सीबीआयचे संलालक म्हणून नियुक्त करण्याची इच्छा होती. मात्र तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांनी लक्ष्मीनारायण यांना पुन्हा तामिळनाडूमध्ये आणलं आणि पोलीस महासंचालक बनवलं.
लक्ष्मीनारायण यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, चरण सिंह, मोरारजी देसाई यांच्यासह अनेक पंतप्रधानांच्या अंतर्गत काम केलं होतं. 1985 साली ते तामिळनाडूचे पोलीस महासंचालक पदावरुन निवृत्त झाले.