नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. लोकसभेत अधीर रंजन चौधरींनी मोदींची तुलना थेट इंदिरा गांधींशी केली. मात्र ही तुलना करताना त्यांची जीभ घसरली.


इंदिरा गांधी आणि पंतप्रधान मोदींची तुलना करताना कुठे गंगा आणि कुठे घाणेरडी नाली असा उल्लेख अधीर रंजन यांनी केला. त्यांच्या विधानावरुन जोरदार वाद सुरु झाला आहे. अधीर रंजन चौधरी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा पंतप्रधान मोदी समोरच बसले होते. चौधरींच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकसभेत गोंधळ उडाला.

“आम्ही पंतप्रधानांचा सन्मान राखतो, पण त्यांनी आम्हाला अशी तुलना करण्यासाठी आणि असे आरोप करण्यासाठी प्रवृत्त करु नये”, असंही अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले. दरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी 2जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा घोटाळ्याच्या आरोपांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. जर सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोषी असतील तर ते लोकसभेत कसे काय बसले आहेत असा सवालही चौधरी यांनी मोदींना विचारला आहे.

दरम्यान मोदींवरील वक्तव्यावर झालेल्या वादानंतर अधीर रंजन चौधरींनी माफीही मागितली आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा कोणताही मानस नसल्याचं सांगत त्यांनी माफी मागितली आहे. आपली हिंदी चांगली नसल्याने नाली म्हणजेच छोटी नदी असा अर्थ होता. पण वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं सांगत चौधरींनी माफी मागितली आहे.