नवी दिल्ली : तामिळनाडूच्या सलेममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना एआयएडीएमके, संघ आणि भाजपवर निशाणा साधला. एआयएडीएमकेच्या वर एक मास्क आहे, जर तुम्ही हा मास्क काढून टाकला तर तुम्हाला संघ आणि भाजप दिसेल, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.


राहुल गांधी जाहीर सभेत म्हणाले, "आजकाल आपण सर्वत्र मास्क पाहतो. मास्क खूप लपवत असतो. जर कोणी हसत असेल तर ते मास्कमध्ये दिसत नाही. या गोष्टी एआयएडीएमके बद्दल आपल्याला माहित असाव्यात कारण ही जुनी एआयएडीएमके नाही. एआयएडीएमके वर मास्क आहे. जर तुम्ही हा मास्क काढून टाकला तर तुम्हाला संघ आणि भाजप दिसेल.”


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यावर नियंत्रण ठेवत असून त्यांनी (पलानीस्वामी यांना) “गुपचूप त्यांच्या पायाला स्पर्श करण्यास भाग पाडले, जे मी स्वीकारू शकत नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.


उत्तर प्रदेशातील एका नेत्याला शाह यांच्यापुढे झुकण्यास भाग पाडले गेले होते, असा दावा त्यांनी केला. कारण तो नेता भ्रष्ट आहे आणि भ्रष्टाचारामुळे या व्यक्तीने आपले स्वातंत्र्य गमावले. पलानीस्वामी यांचीही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, "कोणताही तमिळ अमित शाह आणि मोहन भागवत यांच्या पायाला स्पर्श करू इच्छित नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की मुख्यमंत्री आरएसएस आणि अमित शाह यांच्यासमोर का झुकतात. मुख्यमंत्र्यांना मोदींसमोर झुकायचे नाही, पण ते हतबल आहेत. कारण नरेंद्र मोदी ईडी, सीबीआय नियंत्रित करत आहेत आणि मुख्यमंत्री भ्रष्ट आहेत.


राहुल गांधी यांनी आरोप केला, की "हा भारत आणि तामिळनाडूच्या विचारांवर हल्ला आहे. हे आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांचे विचार आहेत." त्यांच्यापुढे झुकणारा तमिळनाडू त्यांना हवा आहे. ”ते म्हणाले की, तामिळनाडू हा भारताच्या पाया आहे. त्यांनी तमिळ भाषा शिकण्याची इच्छाही व्यक्त केली.