WB Elections 2021 पश्चिम बंगालमधील चंडीपूर येथे एका प्रचारसभेला संबोधित करत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. रविवारी शाह यांनी दावा केला होता की, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये 30 पैकी भाजपच्या वाट्याला 24 जागा येतील, ज्यावर 26  कशाला पूर्ण 30 जागाच म्हणायचं होतं, इथं रसगुल्ला मिळेल; असा जोरदार टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. 


काय म्हणाले अमित शाह? 


आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पार पडल्याचं म्हणत शाह यांनी मतदान प्रक्रियेत हिंसेचं प्रमाण कमी झाल्याची बाब अधोरेखित केली होती. प. बंगालमध्ये भाजपच्या वाट्याला एकूण 200हून अधिक जागा येतील आणि पक्ष बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरेल असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्याबाबत मात्र त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. 


पहिल्या टप्प्यात 84.13 टक्के मतदान 


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी 84.13 टक्के मतदान केलं. निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील माहिती दिली. काही अपवाद वगळता इथं अतिशय शांततापूर्ण मार्गानं मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. 


दरम्यान, अमित शाह आणखी एका कारणामुळं चर्चेत आहेत. ते कारण म्हणजे शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीची. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही भेट अमित शाह आणि शरद पवार यांच्यात झाल्याचं बोललं जात आहे. अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधल्या गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही.