नवी दिल्लीः स्पेनची हायस्पीड ट्रेन टॅल्गो आज भारतात धावणार आहे. टॅल्गोची आज मथुरा ते पलवल या मार्गावर 180 किमी प्रति तास वेगाने धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
जवळपास एक महिनाभर ही चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्ली-मुंबई मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे मथुरा ते पलवल या मार्गावरील चाचणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्ली-मुंबई 10 तासात
मथुरा ते पलवल या 93 किमीच्या मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर ऑगस्टमध्ये नवी दिल्ली ते मुंबई दरम्यान टॅल्गोची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग अतिशय वेगवान होण्यास मदत होणार आहे.
दिल्ली-मुंबई मार्गावर सध्याच्या परिस्थितीला शताब्दी ट्रेन 80 किमी प्रति तास वेगाने चालवल्या जातात. मात्र टॅल्गो 130 किमी प्रति तास वेगाने चालवली जाणार आहे. त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर आता केवळ 10 तासात कापता येणार आहे.
देशातील सर्वात वेगवान ट्रेन
बरेली ते मुरादाबाद या मार्गावर मागच्या महिन्यात टॅल्गोची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने मथुरा ते पलवल या मार्गावर टॅल्गोची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर 180 किमी प्रति तास वेगाने ट्रेन चालवणं हे भारतीय रेल्वेचं एक नवीन रेकॉर्ड असणार आहे. कारण भारतात सध्या ट्रेनचा कमाल वेग 160 किमी प्रति तास एवढा आहे.