मुंबई : डॉ. झाकीर नाईकांच्या आक्षेपार्ह भाषणांसंदर्भात आयबीनं गृह मंत्रालयाला दीड वर्षाआधीच माहिती दिली होती. एवढंच नाही तर 2007च्या ग्लासगो हल्ल्यातील आरोपी सबील अहमद हा जाकीर नाईकांच्या भाषणांमुळे प्रेरित झाला होता. असं स्पष्ट नमूद केलं होतं. पण दीड वर्षांनंतरही गृह मंत्रालयानं झाकीर नाईकवर कुठलीही कारवाई केली नाही.


 

बांगलादेश हल्ल्यानंतर सरकारला जाग, पीस टीव्हीवर बंदी

 

आता बांगलादेश हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे. झाकीर नाईक ज्या पीस टीव्हीवरुन चिथावणीखोर भाषणं देतात, त्याचं प्रसारण करणाऱ्या केबल टीव्ही ऑपरेटर्सवर कडक कारवाई करा, असे आदेश माहिती आणि प्रसारण खात्यानं दिले आहेत.

 

मुख्यमंत्र्यांकडून झाकीर नाईकांच्या चौकशीचे आदेश

 

माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ही घोषणा केली. देशभरातील केबल ऑपरेटर्स अवैधपणे त्याचं खुलेआम प्रसारण करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाकीर नाईकांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रानं नाईकच्या पीस टीव्हीचा निकाल लावला आहे.

 

मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरु

 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी झाकीर नाईक प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवादी घटनांशी संबधित केलेल्या तपासादरम्यान झाकीर नाईकांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

 

झाकीर यांची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन पोलिसांच्या रडारवर

 

झाकीर नाईकांनी आपल्या भाषणादरम्यान हिंदू आणि इतर धर्माच्या देवतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे की नाही, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यासाठी झाकीर यांच्या भाषणाचं ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यात आलं आहे. याशिवाय, झाकीर नाईक यांची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देखील पोलिसांच्या रडारवर आहे.

 

मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंध?

 

2002 आणि 2003 दरम्यान मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान झाकीर नाईक यांचं नाव समोर आलं होतं. मात्र पुराव्याअभावी त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती समोर येते आहे.

 

झाकीर नाईकना अटक करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी

 

वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आलेल्या झाकीर नाईक यांच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीनं जोरदार आंदोलन केलं. यावेळी झाकीर नाईकांना अटक करण्याची, तसंच त्यांच्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. झाकीर फक्त हिंदूच नाही, तर इतर धर्मांच्या देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे. झाकीर नाईकांवर वेळीच कारवाई केली नाही तर देशव्यापी आंदोलन छेडण्याचा ईशाराही हिंदू जनजागृती समितीनं दिला आहे.