मुंबई : दिल्ली-मुंबई दरम्यान धावणाऱ्या हायस्पीड टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. टॅल्गोने दिल्ली-मुंबई हे अंतर 12 तासांपेक्षाही कमी वेळात पार केलं. अंतिम चाचणीवेळी टॅल्गोचा वेग ताशी 150 किलोमीटर ठेवण्यात आला होता.


 

स्पॅनिश टॅल्गो ट्रेन शुक्रवारी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी दिल्लीतून निघाली होती. 12 तासांपेक्षा कमी वेळात पोहोचल्याने दिल्ली-मुंबई प्रवास 4 तासांनी कमी करण्यात टॅल्गोला यश आलं. यापूर्वी 6 वेळा टॅल्गोची चाचणी घेण्यात आली. शनिवारी 9 डब्यांची टॅल्गो 11 तास 49 मिनिटांत मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली.

 

हायस्पीड टॅल्गो ट्रेनचा उद्देश दिल्ली-मुंबईमधील 1384 किमी अंतर कमी वेळात पार करणे हा आहे. सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसला हेच अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा वेळ लागतो. टॅल्गोची अंतिम चाचणी पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांना लवकरच दिल्ली-मुंबई अंतर रेल्वेने कमी वेळात पार करता येणार आहे.